सोलापूर : माळशिरस तालुक्याचे भाजप आमदार राम सातपुते यांनी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागावर व गौण खनिज विभागावर गंभीर आरोप केले आहेत. प्रभारी समाज कल्याण अधिकारी व डेप्युटी सीईओ चंचल पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे. समाज कल्याण विभागातील दलित वस्ती सुधारणा योजनेचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी समाज कल्याण विभागामधील विस्ताराधिकारी नरळे हे पाच टक्के घेतात. त्यांना चंचल पाटील या अधिकाऱ्याची पाठराखण आहे, असा आरोप भाजप आमदार राम सातपुते यांनी केला आहे.
अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी : समाज कल्याण विभागातील नरळे यांचा चार्ज काढून घेण्यात यावा. तसेच, प्रभारी समाज कल्याण अधिकारी चंचल पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार राम सातपुते यांनी केली. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज सोमवारी दुपारी जिल्हा नियोजन आढावा बैठक झाली. या बैठकीत आमदार राम सातपुते यांनी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. यावेळी पालकमत्र्यांनीदेखील चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
माझे आरोप खोटे असतील, तर मी आमदारकीचा राजीनामा देईन : दलित वस्तीचे टक्केवारी प्रकरण जर चुकीचे असेल, तर मी आमदारकीचा राजीनामा देईल, अशी भाषा आमदारांनी वापरली आहे. आमदार सातपुते यांनी गौणखनिजाचे उत्खनन करून मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप यावेळी केला. दलितवस्ती विकास निधी देण्यासाठी ५% लाच म्हणून घेतात, हे मलाच नाही, तर सर्व जिल्हा परिषद सदस्यांना माहिती आहे, असे राम सातपुते यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या प्रभारी समाज कल्याण अधिकारी चंचल पाटील यांच्यावर कारवाई झाली नाही आणि त्यांचे लिपिक नरळे यांना निलंबित केले नाही. माझे हे आरोप खोटे असतील, तर मी आमदारकीचा राजीनामा देईन, असे चॅलेंज आमदारांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : BJP MLA Suspension Cancled : निलंबन रद्द झाल्यानंतर आमदार राम सातपुतेंचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले...