सोलापूर- मागील ५ वर्षाच्या काळात पोलिसांच्या बंदूकीतील गोळ्यांना गंज लागला आहे, असे वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारने कोणतेही काम करायचे शिल्लक ठेवलेले नाही. शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आंदोलने नाहीत, शेतकऱ्यांवर लाठीहल्ला नाही, गोळीबार नाही.
भाजपाचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांची प्रचारसभा करमाळा येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्याचे महसूलमंत्री यांनी आपल्या भाषणामध्ये बोलतांना भाजपाने शेतकऱ्यांचा कोणताही प्रश्न शिल्लक ठेवला नसल्याचे सांगितले. यामध्ये भाजप सरकारने मराठा व धनगर समाजाचे आरक्षण, शेतकरी कर्जमाफीसह इतर केलेल्या कामाचा पाढा वाचून त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीवर टीका केली.
भाजप, शिवसेना, आरपीआय आठवले गट, रासपा, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना महायुतीचा करमाळा येथील रयत भवन येथे समन्वय मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री सदाभाऊ खोत, रणजितसिंह मोहिते, आमदार नारायण पाटील, राजाभाऊ राऊत, शिवाजीराव सावंत, रणजित निंबाळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.