सोलापूर - अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरात सुरू असलेल्या पान टपरी चालकांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. आजतागायत फक्त पोलीस प्रशासन कारवाई करत होते. पण अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करत थेट गुन्हे दाखल करून पान टपऱ्या सील केल्याने सोलापूर शहरातील बहुतांश पान टपऱ्या बंद आहेत. एक प्रकारची धडकी पान टपरी चालकांत बसली आहे. सोलापुरात सुरु असलेल्या अवैध गुटखा विक्री व मावा विक्रीला ब्रेक लागला आहे. पण गुटखा आणि माव्याचे व्यसनी नागरिक मात्र गुटखा आणि माव्या साठी भटकंती करत आहेत.
शहरात 5 मार्चपासून कारवाईची मोहीम-
अन्न व औषध प्रशासन विभागाने 5 मार्च 2021 पासून शहरात सुरू असलेल्या अवैध गुटखा आणि मावा विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे.5 मार्च रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी 4 पान टपऱ्यावर कारवाई केली. त्यानंतर 8 मार्च रोजी सोलापूर शहरातील सात पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या 19 पान टपऱ्यावर कारवाई करण्यात आली. विजापूर वेस ,घोंगडे वस्ती, रेल्वे लाईन,सदर बझार भैय्या चौक भवानी पेठ, नीलम नगर म्हाडा कॉलनी, जुळे सोलापूर डोंनगाव रोड देगाव, आदी भागात कारवाई करून एकूण 24 पान टपऱ्या सील केल्या. आणि चोवीस जणांवर भा. द. वि. 328 नुसार गुन्हा दाखल केला.
हेही वाचा - राष्ट्रवादीच्या बैठकीत गृहमंत्री किंवा आयुक्त बदलावर चर्चा नाही -जयंत पाटील
पान टपरी चालकांत कारवाईचा धसका-
सोलापूर शहरातील पान टपरी चालकांवर आजतागायत फक्त पोलीस प्रशासन कारवाई करत होते. अनेक ठिकाणी मोठं मोठ्या गुटख्याच्या गोडावूनवर पोलिसांची कारवाई होत होती. त्यामुळे अनेक पान टपरी चालकांना अन्न व औषध प्रशासन विभागाची माहितीच नव्हती. पण ज्यावेळी या विभागाने कारवाई सुरू केली त्यावेळी शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाचे अस्तित्व माहिती झाले. पण पान टपऱ्या सील करून थेट गुन्हा दाखल होत असताना ,शहरात सुरू असलेल्या पान टपरी चालकांत कारवाईची भीती बसली आहे.
गुटखा व मावा व्यसनीची मात्र भटकंती-
मार्च महिना सुरू होताच अनेक प्रशासकीय विभाग कारवाईचा बडगा उचलतात. आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांना कारवाईचा आकडा सादर करतात. पण अचानकपणे अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलल्याने शहरातील बहुतांश पान टपऱ्या बंद आहेत. त्यामुळे गुटखा आणि माव्याचे व्यसनी नागरीक मात्र तलप भागवण्यासाठी मात्र भटकत आहेत.
कारवाई करताना अनेक भागात अधिकाऱ्यांसोबत वाद
पान टपरी चालकांना अन्न व औषध विभाग माहीत नसल्याने त्यांनी या अधिकाऱ्यांसोबत वाद केला. विजापूर वेस येथील पान टपरी चालकाने तर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झटापट केली.या कारवाई वेळी अन्न व औषध विभागाचे आयुक्त प्रदीप राऊत, निरीक्षक नसरीन मुजावर,भारत भोसले, मंगेश लवटे, उमेश भुसे, प्रशांत कुचेकर, योगेश देशमुख, प्रज्ञा सुरसे आदी अधिकाऱ्यांनी कारवाई केली.
हेही वाचा - सचिन वाझे प्रकरण समोर करून, डेलकर प्रकरण दाबण्याचा भाजपचा डाव - पटोले