पुणे - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात दिल्ली न्यायालयाने आज (गुरुवार) नव्याने डेथ वॉरंट जारी केले आहे. त्यानुसार निर्भया प्रकरणातील चारही दोषींना २० मार्चला पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी फाशी देण्यात येणार आहे. पटियाला हाऊस न्यायालयाने याप्रकरणी नव्याने डेथ वॉरंट जारी केले आहे. तीन वेळा निर्भयाच्या दोषींची फाशी पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता चौथ्यांदा डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. दरम्यान, यावेळेस तरी निर्भयाच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवणार का, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला.
तृप्ती देसाई म्हणाल्या, आतापर्यंत चौथ्यांदा निर्भयाच्या मारेकऱ्यांचे डेथ वॉरंट निघाले आहे. त्यामुळे यावेळी तरी त्यांना फासावर लटकवले जाणार का, हे पाहावे लागेल. बलात्काराच्या प्रकरणात फासावर लटकवण्याची संख्या पाहिली असता, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या तुलनेत खूप कमी आहे. याआधीची फाशी 2004 मध्ये पश्चिम बंगालच्या बलात्कार प्रकरणातील धनंजय चॅटर्जी याला झाली होती. त्यानंतर 16 वर्षाचा कालावधी गेला. 20 मार्चला निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशी झाली, तर निर्भयाला न्याय मिळेल. पण ज्या लाखो निर्भया न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांच्या न्यायाचे काय? त्यांच्याही मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा देणे गरजेचे आहे. यासाठी निश्चित कालमर्यादा आखणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने यासाठी तातडीने पाऊले उचलणे गरजेचे असल्याचेही तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -
निर्भया प्रकरण : 20 मार्चला दोषींना फासावर लटकवणार ! नव्याने डेथ वॉरंट जारी
दिल्ली हिंसाचार: ५३१ खटले; तर १ हजार ६४७ अटकेत, ताहिर हुसेन फरारच