पुणे - केंद्रात जरी सरकार आपल नसेल तरी राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री आहे आणि येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबई सोबत पुण्यातदेखील भगवाच फडकेल, अशा विश्वास महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचा कार्य कौतुकास्पद -
गेल्या दीड दोन वर्षांपासून राज्यातील सरकार नागरिकांना हिताचे काम करत असून त्याच जोडीला तमाम शिवसैनिकांनी उभे केलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, खा. संजय राऊत, सचिन आहिर, शहर प्रमुखाच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेत जनतेच्या मनातला भगवा फडकेल, असे प्रतिपादन डॉ. गोऱ्हे यांनी केले. शिवसेना पुणे-पर्वती मतदारसंघ विभाग प्रमुख अमोल रासकर यांच्यावतीने 'घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा' आयोजित केली होती. इंदिरा नगर, बिबवेवाडी येथील नागरिकांनी स्पर्धेला उत्फूर्त प्रतिसाद देत जवळपास पाचशेहून अधिक कुटुंबांनी यात सहभाग घेतला. स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते रविवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी बक्षीस वितरण करण्यात आले. या प्रसंगी त्या बोलत होत्या. बक्षिसामध्ये सन्मानचिन्ह, मानपत्र तसेच तिसऱ्या क्रमांकाला वाशिंगमशीन, दुसऱ्या क्रमांकाला फ्रिज, तर प्रथम विजेत्याला टिव्ही बक्षीस म्हणून दिला गेला. सोबतच उत्तेजनार्थ स्पर्धकांना व सहभागी प्रत्येक कुटुंबाला बक्षीसाचे वितरण यावेळी करण्यात आले.