पुणे - सध्या समाजामध्ये लहान मुलांवरती होणारे अत्याचार, ज्येष्ठांकडे केले जाणारे दुर्लक्ष यामुळे आपला समाज सुदृढ समाज बनण्यास अडचणी निर्माण होतात. यावर उपाय म्हणून पुणे पोलिसांच्या भरोसा सेल मार्फत ज्येष्ठांसाठी आणि बालकांसाठी कक्ष उभारले आहेत. याद्वारे त्यांच्या विविध समस्यांचे निराकरण केले जाते. शिवाय त्यांच्यासोबत गैरवर्तणूक करणाऱ्यांवर चाप बसतो. याबाबतीत अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी माहिती दिली आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे म्हणाले, भरोसा सेल फक्त महिलांसाठीच काम करत नाही तर यामध्ये आणखी काही विभाग आहेत. आमच्या येथे ज्येष्ठ नागरिक कक्ष देखील आहे. जे जेष्ठ नागरिक शहरात एकटे राहतात, त्यांच्यासाठी किंवा ज्यांची मुले त्यांना सांभाळत नाही त्यांच्यासाठी एक तक्रार क्रमांक उपलब्ध केला आहे. त्यांना कायद्याद्वारे समुपदेशन दिले जाते. त्यांची योग्य ती काळजी याद्वारे घेतली जाते. ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा आणि तक्रारीचे निराकरण आम्ही या कक्षाद्वारे करतो. वर्षभरामध्ये आमच्याकडे हजार तक्रारी ज्येष्ठ नागरिकांकडून येतात.
बाल कक्ष -
लहान मुलांमध्ये होणाऱ्या लैंगिक अत्याचार किंवा रॅगिंग अशा गुन्ह्यांची माहिती अनेकदा लहान मुले सांगत नाही. यासाठी पोलीस काका आणि ताईद्वारे आम्ही विविध शाळांमध्ये जाऊन मुलांना गुड टच बॅड टच याबद्दल माहिती देत असतो. यामुळे मुलांमध्ये स्वतःच्या बाबतीत घडणार्या चुकीच्या गोष्टींची जाणीव होते. आणि यातून बरीच मुले आपल्या शिक्षकांद्वारे आमच्यापर्यंत पोहोचतात. यामुळे त्यांच्यासोबत होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा बसण्यास मदत होत आहे. सध्या आम्ही पुण्यात ॲक्टिविटी गार्डन बनवत आहोत. याद्वारे मुलांना पोलिसांच्या बद्दल अधिकाधिक माहिती मिळण्यास मदत होईल, अशी माहिती शिसवे यांनी दिली.
बाल गुन्हेगारी आटोक्यात!
विधिसंघर्षग्रस्त मुलांना पंख फाउंडेशनद्वारे आम्ही विविध उपक्रम राबवत असतो. त्यामध्ये मुलांचे पुनर्वसन करणे, त्यांना पाया उभारण्याचे प्रशिक्षित करणे आदी गोष्टी आम्ही करतो. भविष्यात आम्ही अजून चांगले बदल करणार आहोत. आमच्या आतापर्यंतच्या कामगिरीमुळे बाल गुन्हेगारांपैकी 90 % मुले पुन्हा गुन्हेगारी वळली नसल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी सांगितले.