पुणे - मध्यप्रदेशातील सेवादलाच्या कार्यक्रमात प्रकाशित झालेल्या सावरकरांवरील पुस्तकात छापलेल्या आक्षेपार्ह मजकुरावरुन सध्या वादंग माजला आहे. भारतीय जनता पक्षाने या कृतीचा निषेध करत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. यानंतर भाजपतर्फे काँग्रेसचा निषेध करण्यात आला. शहर भाजपच्या वतीने सारस बागेत जवळील सावरकर स्मारक येथे निदर्शने करण्यात आली.
सावरकरांच्या विरोधात अशा प्रकारचे लिखाण करून काँग्रेस आपली संस्कृती दाखवून देत आहे, असे भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले. काँग्रेसला गांधी-नेहरू यांच्या पलिकडे इतर राष्ट्रपुरूष मान्य नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे.
हेही वाचा नागपूर महानगरपालिकेतही 'मी पण सावरकर'च्या टोप्या
तसेच पुस्तक लिहिणाऱ्या संपादक-प्रकाशकांसह इतर संबंधित काँग्रेस सेवा दलातील व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात हे पुस्तक वितरीत करू नये, तसेच देशातही या पुस्तकावर बंदी आणावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेला देखील सावरकरांच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले. या निदर्शनामध्ये महापौर, भाजप शहराध्यक्ष, पुण्यातील भाजपचे आमदार. खासदार उपस्थित होते.