पुणे- राज्यात मिशन बिगेन अंतर्गत अनेक व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, खासगी क्लासला अद्याप परवानगी मिळाली नसल्याने शिक्षकांचे हाल सुरू आहेत. अशा परिस्थितीत खासगी क्लासला परवानगी द्या, अन्यथा आम्हीच क्लास सुरू करू, असा इशारा खासगी क्लासच्या संघटनेने राज्य सरकारला दिला आहे.
राज्यात दळणवळणाच्या सेवा सुरू झाल्या आहेत. बससेवासह बाजारपेठ सुरू झाली आहे. मात्र, अजूनही खाजगी कोचिंग क्लासेसला परवानगी मिळालेली नाही. अनेक शिक्षकांचा उदरनिर्वाह या क्लासवर अवलंबून आहे. पुणे शहरात तब्बल अकरा हजारांपेक्षा जास्त खासगी क्लास आहेत. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून हे क्लास बंद असल्याने या खासगी शिक्षकांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. क्लास घेणाऱ्या शिक्षकांकडून जागेचे भाडे थकले आहे.
गावाकडून शहरात आलेल्या काही खासगी क्लासच्या शिक्षकांना पुन्हा आपल्या गावाकडे जाऊन शेती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने याबाबत तातडीने निर्णय घेऊन क्लास सुरू करावा अशी मागणी खासगी क्लास संघटनेचे शिक्षक गणेश ढाकणे यांनी केली आहे. म्ही असंघटित क्षेत्रात काम करत आहोत. भाडे देण्याची ऐपतही सध्या क्लास शिक्षकांची नाही. या क्लासच्या व्यवसायावर सुमारे १ लाख कुटुंब अवलंबून आहेत.
क्लास सुरू करण्यासाठी परवानगी मिळण्याकरता राज्यभरातील खासगी क्लास संघटनेच्या सदस्यांकडून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २६ ऑक्टोबरला धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जर मागणी मान्य झाली नाही, तर एक नोव्हेंबरपासून आम्हीच क्लास सुरू करू, असा निर्धार या खासगी शिक्षक संघटनेने व्यक्त केला आहे. कारवाई झाली तरी क्लास सुरू करणार, अशी भूमिका या खासगी शिक्षकांनी घेतली आहे.