पुणे - महाराष्ट्रात ओमायक्रॉन या विषाणूचा समूह संसर्ग होण्यास सुरूवात झाली ( Omicron Community Transmission Maharashtra ) असल्याने रुग्ण संख्या अधिक वाढण्याचा धोका आता निर्माण झाला आहे. राज्यासह पुण्यात देखील ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत ( Covid Threat Maharashtra ) आहे. गेल्या काही दिवसांत रुग्णाची संख्या देखील पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळं पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.
ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची गरज नाही
काल देखील राज्यात ओमायक्रॉनचे ८५ रुग्ण वाढले आहेत. पुण्याच्या आयसर संस्थेने ( IISER Institute Pune ) घेतलेल्या 38 नमुन्यांच्या चाचण्यामधून मुंबई, पुण्यात ओमायक्रॉनचा समूह संसर्ग सुरु झाल्याचे प्राथमिक निदान करण्यात आलंय. ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होत असला तरी, रुग्णांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज नसल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं असल्याची माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांनी दिली आहे. त्याचरोबर त्यांनी काळजी करण्याचं कारण नसल्याचं देखील सांगितल आहे.
बुधवारी ३ हजार ९०० नवे रुग्ण
राज्यात बुधवारी ३ हजार ९०० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १ हजार ३०६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रिकवरी रेट हा ९७.६१ टक्के इतका आहे. त्याचबरोबर, राज्यात बुधवारी ८५ नव्या ऑमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, मुंबईत २ हजार ५१० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.