पुणे - ईडी, शिडी, सीबीआय काय वापरायचे ते वापरा, परंतु महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाच वर्षे काम करेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. ते पिंपरी - चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
हेही वाचा - पुणे : महिला लेफ्टनंट कर्नलच्या आत्महत्येचे कारण आले समोर....; ब्रिगेडियरविरुद्ध गुन्हा दाखल
सरकार पाडण्यासाठी काय करता येईल यासाठी भाजपचे प्रयत्न
शरद पवार म्हणाले की, ईडी, शिडी, सीबीआय काय वापरायचे ते वापरा, महाराष्ट्रातील जनतेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचे सरकार निवडून दिलेले आहे. किती प्रयत्न केले तरी हे सरकार पाच वर्षे काम करणार. महाराष्ट्राला आर्थिक अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत दुसऱ्या बाजूने आहे ते सरकार पाडण्यासाठी काय करता येईल यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. सीबीआय, ईडीचा वापर केला जात आहे. मात्र, हे सरकार पाच वर्षे काम करेल, असे शरद पवार यांनी स्पष्ट सांगितले आहे.
कामगार हिताचे रक्षण न करणाऱ्यांना सत्तेत बसायचा अधिकार नाही
दिल्लीतील भाजपचे सरकार नवीन कारखानदारी काढायला अनुकूल नाही. त्यांची भूमिकाच वेगळी आहे. कारखानदारी, सर्वसामान्यांच्या हाताला काम मिळावे ही भूमिका पूर्वीच्या सरकारची होती. कामगारांच्या अधिकाराचे जतन करावे, हे सूत्र त्या पाठीमागचे होते. आज काय आहे? कधीही कोणाला काढून टाकण्याच्या संबंधी कायद्यात बदल केले जात आहेत. नोकरीमध्ये कन्फॉर्मेशन ही संकल्पना असता कामा नये, या संबंधीचा विचार भाजपच्या दिल्लीच्या सरकारमध्ये आहे. ही भूमिका कामगार विरोधी आहे. जे कामगारांच्या हिताचे रक्षण करत नाहीत त्यांना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही, असेही पवार म्हणाले.
हेही वाचा - धक्कादायक! कारचालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवरून 700 मीटर फरफटत नेले