पुणे - पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपा गुंडांसोबत वावरण्याचेच काम करीत नाहीत. तर या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी प्रत्यक्ष गुंडगिरी करायला लावून संघटित गुन्हेगारीत सहभागी होत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला.
भाजपा नगरसेवक विरोधात तक्रार दाखल -
वानवडी प्रभागातील भाजपाचे नगरसेवक धनराज घोगरे यांनी मारहाण केल्याची व धमकावल्याची तक्रार एका ठेकेदाराने केली आहे. यात अधिक चौकशी केली असता, हे प्रकरण तेवढ्यापुरतेच मर्यादित नसून ही संघटित गुन्हेगारी असल्याचे समोर आले आहे. घोगरे यांनी पैशांच्या बदल्यात ठेकेदाराला काम देण्याचे कबूल केले होते. परंतु, कामही दिले नाही आणि घेतलेले पैसेही दिले नाहीत. उलट पैसे मागणाऱ्या ठेकेदाराला मारहाण केल्याची तक्रार ठेकेदाराने १५ दिवसांपूर्वी पोलीस स्टेशनला दिली आहे. ही तक्रार दाखल करून वारंवार पाठपुरावा केल्यानंतर अखेर घोगरेंविरोधात आरोपपत्र दाखल झाले असे जगताप यांनी सांगितले.
फिर्यादीचे अपहरण करून मारहाण -
जगताप पुढे सांगितले की, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी हे प्रकरण मिटविण्यासाठी भाजप नगरसेविका अर्चनाताई पाटील यांचे पती तुषार पाटील यांना फोन केला. त्यानुसार, तुषार पाटील यांनी त्यांच्याच पक्षातील गुंड सदा ढावरेला सांगून फिर्यादीला उचलण्याचे आदेश दिले. तुषार पाटील यांच्या सांगण्यावरून सदा ढावरेने फिर्यादीचे अपहरण करून त्याला कोर्टात घेऊन गेले व मारहाण झाली नसल्याचे, तक्रार नसल्याचे प्रतिज्ञापत्र करण्यात आले. फिर्यादीला थेट उचलून नेल्याने त्याच्याकडे पॅनकार्ड, आधारकार्ड असे काहीही कागदपत्र नव्हते. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून फिर्यादीने प्रतिज्ञापत्रावर खोटी सही केली व लघुशंकेचे निमित्त करून तेथून पळ काढला.
महापौरांनी सांगितल्यानुसार अपहार -
फिर्यादीने थेट दत्तवाडी पोलिस स्टेशन गाठले आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. या वेळी संपूर्ण घटनाक्रम ऐकल्यानंतर पोलिसांनी गुंड सदा ढावरेला अटक केली. सदा ढावरेच्या चौकशीत त्याने तुषार पाटील यांनी सांगितल्यानुसार अपहरण केल्याचे सांगितले. पोलिस निरीक्षकांनी तुषार पाटील यांना फोन केल्यानंतर त्यांनी महापौरांनी सांगितल्यानुसार सदा ढावरेला अपहरण करायला सांगितले, असा जबाब दिला आहे. त्यानुसार, सदा ढावरे व तुषार पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे असे जगताप म्हणले.
सीडीआर काढण्याची मागणी पोलिस आयुक्तांकडे करणार
या प्रकरणाचा थेट संबंध महापौरांपर्यंत येऊन ठेपला आहे. परंतु, महापौरपद हे सन्माननीय पद असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आम्ही करणार नाही. मात्र, भाजपचे शहराध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, सभागृहनेत्यांनी या प्रकरणी खुलासा करावा, अशी मागणी आम्ही करीत आहोत. तसेच, ही घटना गंभीर असल्याने गेल्या १५ दिवसांपासून सदा ढावरेला कुणाकुणाचे फोन येत होते, हे तपासण्यासाठी ढावरेचा ‘सीडीआर’ काढण्यात यावा, अशी मागणी पोलिस आयुक्तांकडे करणार आहोत असे जगताप म्हणले.