पुणे - मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थिगिती देऊन दिड महिना झाला तरी हे सरकार अजूनही पुनर्विचार याचिका दाखल करत नाही. तसेच न्यायमूर्ती भोसले यांनी जे सांगितले आहे, त्या मार्गावरही हे सरकार चालत नाही. विद्वान मंत्री अभ्यास करत आहे, अस सांगताय की काय. हे सरकार मराठा समाजाला मातीत घालायचे काम करत आहे का ? असा संतप्त सवाल शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी सरकारला केला आहे. शिवसंग्राम पक्षाच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यातील नितु मांडके सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आज झालेल्या बैठकीत मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या नितीवर सर्वांच्या वतीने संताप व्यक्त केला. हे सरकार मराठा समाजाच्या काही नेत्यांना हाताशी घेऊन आम्ही काहीतरी करत आहोत, हे भासवण्याचा काम करत आहे. राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेले विषय सोडविले जात नाही. काही मराठी नेत्यांना हाताशी घेऊन संघटनेत दुरी निर्माण करणे, फूट पाडणे वातावरण दूषित करणे हा प्रयत्न सध्या सरकार करत आहे. इंग्रजांची नीती या ठाकरे सरकारने अवलंबली आहे, अशी टीकाही यावेळी मेटे यांनी केली.
'हिंदुत्वावर युती होणार असेल तर स्वागत आहे'
शिवसेना आणि भाजपामध्ये विचारांवर आणि हिंदुत्वावर आधारित युती होती. शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर आघाडी करताना हे विचार कुठे गेले होते. पण जर तीच विचारधारा परत येणार असेल आणि भाजपा आणि शिवसेनेत युती होणार असेल तर स्वागतच आहे, असेही यावेळी मेटे यांनी सांगितले.
'सारथीत गैरप्रकार झालाय'
सारथी संस्थेत गैरप्रकार झाला आहे. हे आम्ही पहिल्यापासूनच सांगत आहोत. काही लोकांनी ते कुरण केले होते, त्यातील पुण्याचे लोक होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तो अहवाल जाहीर करावा. सारथीमध्ये भरतीपासून ते सगळ्याच गोष्टीत गैरप्रकार झाला आहे. त्याची चौकाशी झालीच पाहिजे, अशी मागणीही यावेळी मेटे यांनी केली आहे.
हेही वाचा -प्रताप सरनाईकांच्या पत्रावरून किरीट सोमैयांची बोचरी टीका, म्हणाले...