पुणे - राज्यात 'कोरोना'ग्रस्तांची संख्या वाढू लागली आहे. त्यातही पुणे शहरात कोरोनाची लागण अधिक लोकांना झाली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून येरवडा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांसाठी जेल प्रशासनाने कापडी मास्क तयार केले आहेत. कारागृहातून न्यायालयात जाणाऱ्या प्रत्येक कैद्याला हे मास्क देण्यात येणार आहेत. न्यायालयातून कारागृहात येणाऱ्या प्रत्येक कैद्याला हात धुण्यासाठी सॅनिटायझरही पुरवण्यात येत आहे.
हेही वाचा... कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यातील रिक्षाचालकाची भन्नाट शक्कल
येरवडा कारागृहातून दररोज 150 ते 200 कैदी न्यायालयात ये-जा करत असतात. या कैद्यांचा संपर्क नातेवाईक, वकील आणि न्यायालयातील इतर व्यक्तींशी होत असतो. त्यासाठी येरवडा कारागृहाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून कारागृहातून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक कैद्याला मास्क देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी कारागृहातच कापडी मास्क तयार करण्यात आले आहेत.
हे मास्क कसे वापरावेत, याची माहितीही कैद्यांना जेल प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे. याशिवाय न्यायालयातून येणारे कैदी अथवा काही कामानिमित्त आलेले पोलीस कर्मचारी आणि इतरांसाठी प्रवेशद्वारावरच सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. याने हात धुतल्यानंतरच संबंधित व्यक्तींना आत प्रवेश दिला जात आहे.