पुणे : शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्या वांद्रे, दापोली येथील निवासस्थानासह पुणे-मुंबई आणि रत्नागिरी येथील सात ठिकाणी ईडीची छापेमारी ( ED raids 7 places of Transport Minister Anil Parab ) सुरू आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून ईडीने ही कारवाई सुरू केली आहे. या पथकात जवळपास चार अधिकारी आहेत. अनिल परब यांच्याशी संबंधित चौकशी करण्यासाठी ईडीचं पथक पुण्यातही पोहचलं आहे. ( ED Team in Pune for Interrogation )
ईडीचे पथक पुण्यात दाखल : पुण्यातील कोथरूड परिसरातील दी पॅलेडियम या ठिकाणी 20 व्या मजल्यावर राहणारे विभास साठे यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. अनिल परब यांनी दापोलीतील रिसोर्ट विभास साठे यांच्याकडून विकत घेतला होता. यात १ कोटी १० लाखांचा व्यवहार झाला होता, असे समजते. या व्यवहारात साठे यांना ब्लॅक मनी दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.
महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता : विभास साठे हे एक उद्योजक आहे. पुण्यातील त्यांच्या कोथरूड येथील घरी आणि वनाज येथील घरी सकाळपासूनच ईडीच्या वतीने धाड टाकण्यात येत आहे. सन 2017 मध्ये परिवहन मंत्री अनिल परब यांनी दापोलीतील 42 गुंठे जागा घेतल्यानंतर त्या जागेबाबतीत आपण कोणत्याही प्रकारच्या व्यवहारात नव्हतो, असे मूळ जागा मालक विभास साठे यांनी पत्राद्वारे या पूर्वी स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यानंतर झालेल्या व्यवहारातील कागदपत्रांवर विभास साठे नावाने बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत आणि त्यासाठी पालकमंत्री अनिल परब यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा उपयोग केला आहे, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता.
हेही वाचा : मनी लाँड्रिंगप्रकरणी अनिल परब यांच्याशी संबंधित 7 ठिकाणी ईडीचे छापे