पुणे - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात 13 जुलैपासून लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, हा निर्णय घेण्यापूर्वी भाजपच्या आमदार खासदारांना विचारात घेतले नसल्याचे सांगत खासदार गिरीश बापट यांनी नाराजी व्यक्त केली. यावर बोलताना खासदार बापट म्हणाले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील खासदार, आमदार, नगरसेवक आणि भाजपचे पदाधिकारी सर्व मिळून कोरोनाविरुद्ध लढाई लढत आहेत. अशा परिस्थितीत प्रशासन जर का आम्हाला विचारात न घेता निर्णय घेत असेल, तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल.
भाजपचा आमदार-खासदारांना पुणेकरांनी लाखोंच्या मताधिक्याने निवडून दिले. हेच आमदार, खासदार जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवत असतात. त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नांची आम्हाला चांगल्याप्रकारे जाण आहे. परंतु, आम्हाला कोरोनाच्या बाबतीत राजकारण करायचे नाही. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाला आम्ही सहकार्य करू. परंतु, भाजपच्या लोकसेवकांना विचारात न घेता निर्णय घेत राहिले, तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल, असे बापट यावेळी म्हणाले.
हेही वाचा - महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होतोय - शरद पवार
लॉकडाऊन हा काही एकमेव उपाय नाही -
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा काही एकमेव उपाय नाही. यासाठी रुग्णालये, रुग्णवाहिका, औषधे यांची सुसज्जता महत्त्वाची आहे. त्याशिवाय कंटेन्मेंट भागात नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेही गरजेचे आहे. काही लोकांचा बेशिस्तपणामुळे शिस्तीत वागणाऱ्या सर्व लोकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचे खासदार गिरीश बापट यावेळी म्हणाले.