पुणे - गुरुवारी ब्राह्मण महासंघाच्या वतीने भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्या तृप्ती देसाईं यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. राज्यातील देवींच्या मंदिरांमध्ये यापुढे महिला पुजारी नेमाव्यात, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.
फोटोला फासले काळे
ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीने हे आंदोलन केले. यावेळी तृप्ती देसाई यांच्या फोटोला काळेदेखील फासण्यात आले... देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ असलेल्या माहूरच्या रेणुका माता मंदिरात महिला पुजाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी त्यांनी केली होती.
तृप्ती देसाई सध्या नांदेड दौऱ्यावर
त्यांनी माहूर येथे जाऊन रेणुका मातेचे दर्शन घेतले. राज्यातील सर्व देवस्थानच्या ट्रस्टमध्ये महिलांचा समावेश असावा, शिवाय देवीच्या मंदिरात महिला पुजारी असावी, अशी मागणी आपण राज्य सरकारकडे केली असल्याचे त्या म्हणाल्या. यावर निर्णय झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यांच्या या भूमिकेला विरोध करत ब्राम्हण महासंघाने हे आंदोलन केले. त्या सातत्याने हिंदू धर्माच्या परंपराबाबत विरोधी भूमिका घेत असतात. फक्त पब्लिसिटी स्टंट त्या करत असतात. मात्र यापुढे हे खपवून घेणार नाही, असे ब्राह्मण महासंघाच्या महिला कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.