पुणे - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुण्यातील कार्यालयाच्या नामफलकाला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. जे एन यू प्रकरणावरून देशभारत निदर्शने होत असताना पुण्यात या वादाचा दुसरा अंक पहायला मिळाला. यानंतर आमदार राम सातपुते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुंडांनी अभाविप कार्यालयात कुणी नसताना भ्याड हल्ला केला. यानंतर आमदार राम सातपुते यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सुरू आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि अभाविप समोरासमोर आले आहेत. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज पुण्याच्या टिळक रस्त्यावरील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयावर हल्ला चढवत अभाविपच्या नामफलकाला काळे फासले. याप्रकारामुळे अभाविप चांगलीच खवळली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'या' कृत्याचा योग्य भाषेत समाचार घेऊ असा धमकीवजा इशाराच अभाविपचे महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी दिला.
यावेळी राम सातपुते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुंडांनी अभाविप कार्यालयात कुणी नसताना भ्याड हल्ला केला. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे पुरोगामीत्व हेच का? एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारायच्या, चांगले चांगले ट्विट करायचे आणि एखाद्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात कोणीही नसताना भ्याड हल्ला करायचा. या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो.
शरद पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तिघाडी सरकार स्थापन करून सत्तेचा माज सुरू केला आहे. सत्ता आली की गुंडांना घेऊन हैदोस घालायचा आणि सत्ता नसली की बिळात जाऊन लपायचे ही शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्रवृत्ती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेचा योग्य तो समाचार घेतला पाहिजे अन्यथा अभाविप रस्त्यावरून आम्ही निषेध केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही सातपुते यांनी यावेळी दिला.