पणजी (गोवा) - कर्नाटकात झालेल्या रस्ता अपघातात केंद्रीय आयुष आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना रात्री सव्वा अकराच्या सुमारास गोव्यात आणून आंबोळी गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर चार ठिकाणी सर्जरी करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
आज सकाळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमेकॉत, नाईक यांची चौकशी करण्यासाठी आले असता म्हणाले की, 'आयुषमंत्री नाईक यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. हातावर दोन तर पायांवर दोन अशा त्यांच्यावर चार ठिकाणी सर्जरी करण्यात आल्या आहेत. रात्री जेव्हा येथे आणण्यात आले तेव्हा मी दोन वाजेपर्यंत येथेच होतो. तसेच एक वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून चौकशी केली होती. तसेच आज सकाळी सात वाजता पुन्हा चौकशी केली आहे. तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सकाळी चौकशी केली. सिंह दुपारी 1 वाजेपर्यंत गोव्यात दाखल होतील. तर गोवा दौऱ्यावर असलेले उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू सातत्याने चौकशी करत आहेत.'
सोमवारी कर्नाटकातील येल्लापूर (ता. अंकोला) येथे देवदर्शन करून गोकर्णच्या दिशेने जात असताना संध्याकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान आयुषमंत्री नाईक यांच्या इनोव्हा कारचा हिल्लूर-होरकांबी (उत्तर कर्नाटक) येथे अपघात झाला. त्यामध्ये त्यांच्या पत्नी विजया आणि स्वीय सहाय्यक दीपक घुमे यांचा जागीच मृत्यू झाला. तर मंत्री नाईक यांच्यासह अन्य तिघे गंभीर जखमी झाले. नाईक यांना रात्री तातडीने गोमेकॉमध्ये आणण्यात आले.
दरम्यान, प्राप्त माहितीनुसार नाईक शुक्रवारपासून सपत्नीक कर्नाटक दौऱ्यावर होते. त्यांनी सोमवारी येल्लापूर येथील गंटे गणेश दर्शन घेतले. त्यानंतर कर्नाटकचे कामगारमंत्री शिवराम हेब्बार यांचा पाहुणचार घेतला. या औपचारिक भेटीत कर्नाटकातील संस्कृती आणि धार्मिक उत्सव यावर चर्चा झाली. त्यानंतर ते गोकर्णला जाण्यासाठी निघाले.
हिल्लूर-होसकांबी जवळ अंतर्गत रस्त्यावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ती झाडावर आदळली. अपघात इतका मोठा होता की, विजया नाईक यांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी घुमे यांना रुग्णालयात नेत असताना त्यांचाही मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री सावंत यांनी वेगाने सूत्रे फिरवत गंभीर जखमी नाईक यांना रस्तामार्गे रुग्णवाहिकेतून रात्री गोमेकॉत आणले. अन्य दोघांवर कोणत्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत याची माहिती मिळू शकलेली नाही.