पणजी - राज्यभरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबत पोलीस महानिरीक्षकांची बैठक पार पडली. यामध्ये मंडळांना सुरक्षेसाठीच्या आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पोलीस कशा प्रकारे तैनात असतील याची माहितीदेखील देण्यात आली आहे. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
हेही वाचा - विक्रोळीत श्री गुरू दत्त मंडळाच्या गणेशाचे ढोलताशांच्या गजरात आगमन
पणजीतील पोलीस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलीस उपमहानिरीक्षक परमादित्य म्हणाले, उत्तर गोव्यात 76 तर दक्षिण गोव्यात 142 सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. प्रत्येक मंडळाला महोत्सव काळात सीसीटीव्ही कॅमेरे लावून किमान पंधरा दिवसांचे फुटेज साठवले जाईल अशी व्यवस्था करावी. तसेच विद्युत पुरवठा सुरळित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी. सुरक्षेसाठी पोलीस तैनात असतीलच परंतु, अतिरिक्त खासगी सुरक्षारक्षक नियुक्त करावे. त्याबरोबरच कमीतकमी प्रवेशद्वारे ठेवावी म्हणजे गर्दीवर नियंत्रण राखणे सोपे होईल, अश्या सूचना करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - बाप्पाच्या आगमनाची आतुरता; गणेश मूर्तींनी सजली धुळे बाजारपेठ
महोत्सव काळात रात्रीची पोलीस गस्त वाढवण्यात येणार आहे, असे सांगून परमादित्य म्हणाले, गोवा हे पर्यटन राज्य असल्याने दहशतवादी कृत्य घडू नये याचीही खबरदारी घेतली जाईल. उत्तर गोव्यात 24 तर दक्षिण गोव्यात 27 अशी मंडळे आहेत जेथे दरदिवशी मोठ्याप्रमाणात भाविक भेट देत असतात. अशा ठिकाणी सर्व सुरक्षेचे उपाय केले जातील. त्याबरोबर गणेश विसर्जन स्थळी आवश्यक सुरक्षा आणि जीवरक्षक तैनात केले जाणार असल्याचे परमादित्य यांनी सांगितले.
दरम्यान, गणेशोत्सव काळात ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सुट्टी घेतली आहे, अशांची सुट्टी रद्द केली जाणार नाही. तसेच या काळात अधिकाधिक कर्मचारी सुरक्षेसाठी उपलब्ध केले जाणार आहेत, असेही परमादित्य यांनी सांगितले.