पणजी - लोकसभेच्या दक्षिण गोवा मतदारसंघातील कुंकळ्ळीतील विधानसभा मतदान केंद्र क्रमांक ३४ वरील सर्व इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) तक्रारीनंतर गोवा मुख्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.
आम आदमी पक्षाचे गोवा संयोजक आणि दक्षिण गोव्याचे उमेदवार एल्वीस गोम्स यांनी याविषयीचे ट्विट केले आहे. 'मतदान केंद्र क्रमांक ३१ वर जेव्हा सुरुवातीला प्रात्यक्षिक दाखविण्यात आले तेव्हा भाजपला १७, काँग्रेसला ९, आम आदमी पक्षाला ८ आणि अपक्षाला १ मत दाखविण्यात आले आहे,' असे ते म्हणाले. हे दक्षिण गोवा निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आयोगाकडून याची दखल घेत सर्व ईव्हीएम बदलण्यात आली आहेत.
गोम्स यांचे ट्विट रिट्विट करतांना आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, गोव्यात सदोष ईव्हीएम भाजपकडे मत वळवत आहेत, हे खरे आहे की, हाच कार्यक्रम तयार करण्यात आला आहे?
दरम्यान, लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी मतदारसंघातील कोठंबी या आपल्या गावी मतदानाचा हक्क बजावला. तसेच त्यांच्या पत्नी आणि गोवा भाजप महिला मोर्चा अध्यक्ष सुलक्षणा सावंत यांनीही मतदान केले. राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी दोनापावला येथे मतदान केले. दक्षिण गोवा खासदार आणि भाजप उमेदवार नरेंद्र सावईकर या़ंनी पत्नी आणि मुलींसह येत फोंडा मतदान केंद्रावर हक्क बजावला.