पणजी - गोवा पर्यटन विकास महामंडळाने सुरू केलेल्या 'गोवा माईल्स' या अॅप बेस्ड टॅक्सी सेवेमुळे पारंपरिक टॅक्सी व्यावसायिकांनी शुक्रवारपासून संप पुकारत एकही टॅक्सी रस्त्यावर उतरवली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पर्यटकांना त्रास सहन करावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्यटकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास गोवा प्रशासन सक्षम असल्याचे ट्विट केले आहे.
गोवा सरकारच्या अॅप बेस टॅक्सी धोरणाला विरोध करत स्थानिक पारंपरिक टॅक्सी व्यावसायिकांनी शुक्रवारपासून आपल्या टॅक्सी ररस्त्यावर उतरवलेल्या नाहीत. त्यामुळे विमानतळ, रेल्वे आदी ठिकाणी पर्यटक आणि प्रवासी यांना एनोक अडचणी आल्याचे चित्र दिसत आहे. यावर सरकारने काही ठिकाणी सार्वजनिक बससेवा उपलब्ध करून दिली होती.
आज शुक्रवारीही सर्व टॅक्सी चालक संपावर असल्यामुळे मुख्यमंत्री सावंत यांनी, गोव्यातील पर्यटन उद्योग सांभाळण्यासाठी राज्य प्रशासन सक्षम आहे. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी आवश्यक वाहतूक व्यवस्था पुरवली जाईल. गोव्यात येणाऱ्या देशी आणि विदेशी पर्यटकांचे स्वागतच आहे, असे ट्विट केले आहे.
गोवा पर्यटन विकास महामंडळाकडून 'गोवा माईल्स' या अॅप बेस्ड टॅक्सी सेवेची निर्मीती
गोवा पर्यटन विकास महामंडळाने सुरू केलेल्या 'गोवा माईल्स' या अॅप बेस्ड टॅक्सी सेवेमुळे स्थानिक टॅक्सी व्यावसायिक अडचणीत आले आहे. त्यामुळे त्यांच्या हिता विचार करून सरकारने हे अॅप बंद करावे, अशी मागणी पारंपरिक टॅक्सी व्यावसायिकांनी केली आहे. यावर विधानसभेत चर्चाही झाली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी 'गोवा माईल्स' ही 'अॅप बेस्ड टॅक्सी' सेवा सुरूच राहणार असल्याचे सांगितले.
विरोध करणाऱ्यांनी तीन महिने अॅप वापरावे अथवा दुसरा पर्याय म्हणून स्वत: अॅप तयार करावे
जे विरोध करतात त्यांनी तीन महिने हे अॅप वापरून पहावे आणि आपल्याला सांगावे. अथवा दुसरा पर्याय म्हणून त्यांनी स्वत: अॅप तयार करावे. सरकार त्यालाही गोवा माईल्सप्रमाणे प्रोत्साहन देईल, असे सांगताना गोव्यात अॅप बेस टॅक्सी सेवा सुरूच राहणार, असेही सांगितले.