पणजी : काँग्रेस सोडून आम्ही दहा आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. यावर आजच्या जिल्हा पंचायत निवडणुकीत लोकांनी भाजपाच्या बाजूने दिलेल्या कौलाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामधून आमची दिशा योग्य असल्याचेच सिद्ध झाले, अशी प्रतिक्रिया गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्य मंत्री विश्वजीत राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानवडे उपस्थित होते.
भाजपा कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना कवळेकर म्हणाले, आजचा कौल म्हणजे लोकांनी आम्ही कृती मानून घेतल्याचे चिन्ह आहे. मी प्रतिनिधित्व करत असलेल्या विधानसभा मतदारसंघातील जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपाचे चारही उमेदवार निवडून आले आहेत. एवढेच नव्हे काँग्रेस उमेदवारची अनामत रक्कम जमा झाली आहे. हा विजय म्हणजे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या विकासाची पोचपावती आहे. तसेच काँग्रेसमधून भाजपात गेलेले आणि मूळ भाजपा कार्यकर्ते यांनी एकत्रित येत केलेल्या कामाचे फळ आहे.
कोविड महामारीच्या काळात केवळ भाजपा आणि मुख्यमंत्री सावंत यांनी गोमंतकीयांसाठी काम केले, असे सांगत कवळेकर म्हणाले, प्रत्येक निवडणूक भाजपासाठी महत्वाची असते. यापुढे असेच काम करत नगरपालिका, महानगरपालिका निवडणूक जिंकणार असून 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे 30 आमदार निवडून आणणार, असेही ते म्हणाले.
त्या जागेवर भाजपाचाच विजय
उत्तर गोव्यातील सांत लॉरेन्स मतदारसंघात भाजपा उमेदवार विजयी झाल्यानंतर त्यावर आक्षेप घेत पुन्हा मतमोजणीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पुन्हा मतमोजणी करण्यात आली असता भाजपा उमेदवार विजयी झाले.