पणजी (गोवा) - देशासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पणजी विधानसभा निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपच्या वतीने बाबुश मोंसरात यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे, नाराज झालेले माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी त्यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. दरम्यान सध्या पर्रीकर आणि मोंसरात यांच्या लढतीची चर्चा संपूर्ण देशभरात सुरू झाली आहे.
हेही वाचा - Goa Assembly Elections 2022 : बदल करण्यासाठीच मतदान - उत्पल पर्रीकर
फडणवीस यांचीही प्रतिष्ठा पणाला
उत्पल पर्रीकर यांना भाजपने डावलून बाबुश मोंसरात याना तिकीट दिले आहे. मात्र, राज्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले होते की, उत्पल पर्रीकर यांना तिकीट देण्यासाठी त्यांचे कर्तृत्व मोठे नाही, म्हणून आम्ही त्यांना तिकीट दिले नाही. इथूनच उत्पल पर्रीकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वादाची ठिणगी पडली आणि फडणवीस यांच्यावर पर्रीकर यांनी जोरदार टीका केली. त्यामुळेच, पणजीची उमेदवारी देण्यात आलेल्या बाबुश मोंसरात यांना विजयी करण्याचे सर्वात मोठे आव्हान भाजपा आणि पर्यायाने फडणवीस यांच्या समोर आहे.
विजय आपलाच होणार - बाबुश मोंसरात
विधानसभा निवडणुकीत मी भाजपसोबत काम करत आहे. त्यामुळे, मला भाजपा आणि पर्यायाने पणजीच्या मतदारांचा पाठिंबा आहे. म्हणून आपला विजय निश्चित असल्याचे बाबुश मोंसरात यांनी सांगितले.
हेही वाचा - Telangana CM : 'सरकारने सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे द्यावे', तेलंगणा सीएम KCR यांचा राहुल गांधींना पाठिंबा