पणजी - गोव्यातील दाबोळी विमानतळावर मस्कतहून आलेल्या प्रवाशाकडून ४८ लाख ५० हजार रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
ओमन एअर या विमानाने मोसीन बेपारी नावाचा प्रवासी मस्कत ते गोवा प्रवास करत होता. त्याने बुटाच्या तळव्यात आणि विजारीच्या पट्यात सोने लपवले होते. दाबोळी विमानतळावर मोसीन बेपारी उतरल्यावर अबकारी विभागाचे अतिरिक्त आयुक्त जे.के मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त एन.जी पटेल आणि दीपक गवई यांनी तपासणी केली. यावेळी अधिकाऱ्यांना त्याचाकडे अवैधरितीने आणलेले ४८ लाख ५० हजारांचे सोने आढळले. अधिकाऱयांनी कारवाई करताना सोने जप्त केले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
गोवा विमानतळावर एप्रिल २०१९ पासून कस्टम विभागाने आतापर्यंत ६० लाख ५८ हजार रुपये किंमतीचे सोने जप्त केले आहे.