पणजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुसऱ्यांदा आयुष तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. सोबतच त्यांना लकवर स्वास्थ्य लाभावे यासाठी शुभेच्छा दिल्या.
आठवडाभरापूर्वी कर्नाटकात रस्ता अपघातात जखमी झालेल्या नाईक यांना तत्काळ त्याच रात्री बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) दाखल करण्यात आले होते. येथेच त्यांच्यावर शस्रक्रिया आणि अन्य उपचारसुरू करण्यात आले. त्यानंतर आज पहिल्यांदाच डाॅक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना व्हिलचेअरवरून मोकळ्या हवेत आणण्यात आले.
तेव्हा नाईक म्हणाले, 'बऱ्याच दिवसांनी मी सूर्य प्रकाश पाहिला. देवाचे कृपार्शीवाद आणि तुम्हा सर्वांच्या प्रार्थनामुळे आज मी ठीक होतोय. मी येत्या काही दिवसांत तुम्हा सर्वांना निश्चितच भेटणार आहे. मला आज प्रथमच मोकळ्या हवेत आणण्यात आले. याचा अर्थ माझ्या स्वास्थ्यात झपाट्याने सुधारणा होत आहे, असेही ते म्हणाले. शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांनी नाईक यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत तब्येतीची चौकशी केली होती.
धर्मस्थळला एका कार्यक्रमाला उपस्थित राहून दि. 11 जानेवारी रोजी गोव्यात परतत असताना गोकर्ण नजीक होसूर गावात नाईक यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. त्याच दिवशी त्यांना तातडीने गोव्यात आणण्यात आले होते. त्या दिवसापासून ते गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात उपचार घेत आहेत.त्यांच्या अपघातानंतर संरक्षमंत्री, राजनाथसिंह, केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी गोमेकॉत जाऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली होती. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत संपूर्ण उपचारांवर लक्ष ठेवून आहेत. नाईक यांच्यावर गोमेकॉच्या डॉक्टरांचे पथक उपचार करत असून दिल्लीच्या एम्सचे पथकही त्यांच्या उपचारांवर लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, गोमेकॉने जारी केलेल्या मेडिकल पत्रकानुसार नाईक यांची तब्येत सुधारत आहे. त्यांच्या जखमा भरत असून त्यांच्या नाडीचे ठोके, रक्तचाचण्या, सीटीस्कँन सर्वसाधारण आहे. त्यामुळे आज पहिल्यांदाच व्हिलचेअरवरून आयसीयुबाहेर मोकळ्या हवेत आणण्यात आले होते.