मुंबई - हिवाळा संपत आला असताना तापमानात सातत्याने बदल होत आहेत. मुंबईत यावर्षी अनेक वर्षानंतर चांगली व प्रदीर्घ काळ थंडी पडल्याचे सांगितले जाते. फेब्रुवारीत तापमान साधारणत: कमी असते. मात्र, तीन दिवसांपासून मुंबईत अचानक तापमान वाढून उकाडा जाणवू लागला होता. त्यामुळे थंडी संपली की काय, असा प्रश्न सर्वांना पडला. मात्र, रविवारपासून पुन्हा हवेत गारवा परतला. त्यानंतर आता मुंबई, भागात थंडीचा जोर आणखी वाढला असून थंडगार बोचर्या वार्यांनी मुंबईकरांना चांगलेच गारठवून टाकले आहे. अजून एक-दोन दिवस हा थंडीचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मुंबईत सध्या कमाल तापमान २४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. येत्या दोन दिवसांत शहरात सर्वात कमी तापमानाची नोंद होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईत काही वर्षानंतर अशी जोरदार थंडी पडली असून आता हिवाळा संपण्याच्या वेळी दोन दिवस थंडी जास्त असेल, असे सांगण्यात येते.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागांत व कोकण, गोव्याच्या उर्वरित भागांत किमान तापमानात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.
१८ आणि १९ फेब्रुवारी रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. २० आणि २१ फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारसह मंगळवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल ३१ आणि किमान १६ अंशाच्या आसपास तापमान राहील.
महिनाभर थंडी हुलकावणी देणार
वातावरणात सतत होत असलेले बदल, उत्तर भारतात सुरू असलेली हिमवृष्टी, यामुळे सध्या सतत हुलकावणी देणारी थंडीची स्थिती अजून महिनाभर तरी कायम राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आपल्याकडे होळीपर्यंत थंडी असते असे मानण्याचा प्रघात आहे. होळी झाली, की थंडी परतली असे मानले जाते. तो अंदाजही मान्य केला, तर साधारण महिनाभर तरी तापमानात सतत चढ-उतार होत राहतील, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे.