नाशिक - चिकन व मटण खाल्ल्याने कोरोना विषाणुची लागण होत असल्याच्या अफवा पसरल्या. यानंतर भारतीय बाजारात चिकनची मागणी मोठ्या प्रमाणात घटली. काही ठिकाणी कोंबड्यांना जीवंत गाडण्यात आले तर काही ठिकाणी या कोंबड्या फेकून देण्यात आल्या. सामान्य मांसाहार करणाऱ्या नागरिकांनी देखील पाठ फिरवल्याने पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला. आता यासंबंधी गैरसमज दूर करण्यासाठी जेलरोड भागातील एका दुकानदाराने मोफत जीवंत कोंबड्यांचे वाटप केले. यामुळे नाशिककरांची मोठी झुंबड या ठिकाणी उडाली होती.
मागील महिन्यापासून सातत्याने चिकन खाणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने चिकन उद्योगाचे 900 कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. 120 रुपयांना विकली जाणारी जीवंत कोंबडी आता अवघ्या 15 ते 20 रुपयात विकण्यात येत आहे. यामुळे दुकानदार देखील अडचणीत सापडले आहे. यावर अनोखी शक्कल लढवत या चिकन विक्रेत्याने मोफत जीवंत कोंबड्यांचे वाटप केले. ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने स्थानिकांनी गर्दी केली होती.