नाशिक - कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा आर्थिक फटका खाजगी व्यवसाय,उद्योगा सोबत सरकारी खात्यातील विभागांना देखील बसला आहे. नाशिकच्या आरटीओ महसुलात मागील वर्षांच्या तुलनेत यंदा 64 कोटींची घट झाली आहे.
लॉकडाऊन इफेक्ट : नाशिकच्या आरटीओ महसुलात 64 कोटींची घट कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. या काळात सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. लॉकडाऊनचा फटका लहान, मोठ्या उद्योग व्यवसाय सोबत सर्व सामान्य कष्टकरी नागरीकांनाही जाणवला. परिणामी सरकारी महसूल प्रभावित झाला. शहर परिवहन विभागाला जुलै अखेरपर्यंत केवळ 30 कोटींचा महसूल प्राप्त झाला असून तो गतवर्षाच्या तुलनेत 65 टक्क्यांहून कमी आहे. मोठ्या प्रमाणात महसूल देणारा विभाग म्हणून नाशिक परिवहन विभाग ओळखला जातो. मात्र कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक नुकसानापासून आरटीओ विभाग देखील सुटू शकला नाही. नाशिकच्या आरटीओ विभागात वाहन नोंदणी, वाहन नंबर, फिटनेस, लायसन्स, परमिट आदी कामे केली जातात. मात्र लॉकडाऊन काळात ही सर्व कामे ठप्प झाल्याने त्याचा परिणाम महसूलावर झाला आहे.मागील वर्षी एप्रिल 2019 ते जुलै 2019 या काळात नाशिक परिवहन विभागात 29 हजार वाहने नोंदणीकृत झाली होती. त्यातून आरटीओला 94 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. तर एप्रिल 2020 ते जुलै 2020 काळात केवळ 8 हजार वाहने नोंदणीकृत झाली असून त्यातून आरटीओला केवळ 30 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यामुळे मागील वर्षी पेक्षा यंदाच्या वर्षी महसुलात 64 कोटी रुपयांची घट दिसून येत आहे.
नोंदणीकृत वाहने आणि मिळालेला महसूल जुलै 2019 ते जुलै 2020
मोटर सायकल नोंदणी - 21105 (2019) मोटर सायकल-5331 (वर्ष - 2020)
मोटर कार- 4119 (2019) मोटर कार-1406 (2020)
अन्य वाहने- 4038 (2019) अन्य वाहने-1432 (2020)
एकूण वाहने (2019) -29342 एकूण वाहने(2020) -8069
सध्या नाशकातील सर्व परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. ऑगस्टपासून आरटीओ विभागाचे कामकाज देखील पूर्वपदावर येत आहे. नागरिक नवी वाहने खरेदीला पसंती देत असल्याने वाहने नोंदणीचा आकडा वाढणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी सांगितले.