नाशिक - भाजप सरकारच्या काळात राज्यात भारनियमन, वीज तोडणी, दरवाढ झाली नाही. सध्या राज्यात सुरु असलेल्या भारनियमनसाठी (Load Shedding in Maharashtra) केंद्राकडे बोट दाखवले जात असले तरी त्यास पूर्णपणे महाविकास आघाडी सरकार जबाबदार (Mahavikas Aghadi Responsible Load Shedding) असल्याची जोरदार टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar on Load Shedding) यांनी केली.
अडीच वर्षात राज्यात एकही नवीन वीज प्रकल्प नाही - भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात शुक्रवारी (दि.२२) आयोजित पत्रकार परिषदेत प्रवीण दरेकर बोलत होते. केंद्र सरकारकडून राज्याला मुबकल प्रमाणात कोळसा उपलब्ध करुन दिला जात आहे. २०२०- २१ या वर्षात ७० लाख मेट्रिक टन कोळसा पुरवला. चालू वर्षात दिवसाला २.१४ लाख टन तर एप्रिल महिन्यात २.७६ लाख टन कोळसा दिवसाला पुरवला जात आहे. मात्र, नियोजनाअभावी भारनियमनचे संकट उभे ठाकले आहे. राज्य सरकारने महाजनको व कोल इंडियाचे पैसे थकवले आहे. मागील अडीच वर्षात राज्यात एकही नवीन वीज प्रकल्प सुरु झाला नाही. वीज खरेदीसाठी प्रयत्न होत नाही. टक्केवारी मिळत नसल्याने नवे वीज निर्मिती प्रकल्प होत नसल्याचा घणाघात दरेकर यांनी केला.
राणांना समर्थन - खासदार नवनीत राणा यांनी मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करणार याबाबत दरेकर यांना विचारले असता ते म्हणाले की, ही भाजपची भूमिका नाही. शिवसेनेने पुन्हा हिंदुत्वाकडे वळावे यासाठी त्यांनी ही भूमिका घेतली, तर त्यात चुकीचे काही नाही, असा टोला दरेकर यांनी सेनेला लगावला.
राज ठाकरेंच्या हिंदुत्वाचे स्वागत - महाराष्ट्रात जर औवेसीला परवानगी मिळू शकते मग राज ठाकरे यांना का नाही, असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला. राज्य सरकारने विचारांची लढाई विचाराने लढावी असे सांगत दंडुलशाही चालणार नाही, असा इशारा दरेकर यांनी दिला. तसेच राज ठाकरे हिंदुत्वाची नवी भूमिका घेऊन चालले आहेत. आमची विचारधारा पुर्वीपासून हिंदुत्वाची आहे. भविष्यात जिथे आवश्यकता असेल तिथे सोबत येऊ, असे सुतोवाच देत अप्रत्यक्ष युतीचे संकेत दिले.