नाशिक - सोशल मीडियापासून मी लांब राहत असून माझे फेसबुकवरील एकही अधिकृत अकाउंट नसल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केला आहे. नाशिकमध्ये आल्यानंतर सायबर सेलला सूचना करून माझ्या नावाने सुरू असलेले फेसबुकवरील 19 बनावट अकाउंट बंद केल्याची माहितीही नांगरे पाटील यांनी दिली आहे.
युवकांचे आयकॉन असलेले पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे देखील सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे सोशल मीडियामुळे त्रस्त झाले आहेत. त्यांच्या नावाने सुरू करण्यात आलेले डझनभर बनावट फेसबुक अकाउंट बंद करण्याच्या त्यांनी सायबर क्राइमला सूचना दिल्या आहेत. फेसबुक तसेच व्हॉटस अॅपवर माझ्या नावाने फिरणारे मॅसेज देखील बनावट असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकला पोलीस आयुक्त म्हणून रुजू झाल्यापासून फेसबुकवरील 19 बनावट अकाउंट बंद केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
आपली खास कर्तृत्व शैली, वक्तृत्व यामुळे युवकांचे आयकॉन म्हणून विश्वास नांगरे पाटील यांची ओळख आहे. त्यांच्यासारखे धाडसी आयपीएस अधिकारी व्हावे म्हणून अनेक युवक स्वप्न उराशी बाळगून आहेत. म्हणून त्यांना फॉलो करणारा युवक वर्ग देखील मोठा आहे. त्यामुळे फेसबुकवर त्यांच्या नावाने असलेल्या अकाउंटलाही जोरदार प्रतिसाद मिळतो. विश्वास नांगरे पाटील हे तरुणांचे आयकॉन असल्यामुळे फेसबुक पोस्टला मिळणारे लाखो लाईक, कमेंट्स पाहिल्या तर आपल्याला आश्चर्य वाटत नाही.
या पोस्टमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा, प्रेरणादायी विचार, कविता, वेगवेगळी छायाचित्र असा सगळ्या प्रकारच्या पोस्टचा समावेश असतो. मात्र असे असले, तरी विश्वास नांगरे पाटील यांनी माझ्या नावाने सोशल मीडियावर फिरणाऱ्या पोस्ट माझ्या नसून या पोस्टवर विश्वास ठेवू नका, असे म्हटले आहे. मात्र त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे युवक वर्गामध्ये नाराजी पसरेल हे मात्र नक्की. .