नाशिक : कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना एकीकडे आंदोलन करावे लागत आहे. तर दुसरीकडे डॉक्टरनेच तीन इंजेक्शनसाठी चक्क २५ हजार रुपये मागितल्याचा संतापजनक प्रकार पंचवटी परिसरात समोर आला आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याच्या जागरूकतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे 'रेमडेसिवीर'साठी काळाबाजार होत असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
तीन रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी मागितले 25 हजार रूपये
यातील संशयित डॉक्टर एका नामांकित हॉस्पिटलचा संचालक असल्याची माहिती आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्याने पुराव्यांसह पंचवटी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी संबंधित डॉक्टरला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्या सामाजिक कार्यकर्त्याच्या मित्राचे आई-वडील कोरोना पॉझिटिव्ह असून, त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता होती. त्यामुळे या सामाजिक कार्यकर्त्याने संबंधित डॉक्टरशी संपर्क साधला असता त्याने तीन इंजेक्शन मिळतील. मात्र, त्यासाठी २५ हजार रुपये लागतील, असे सांगितल्याने त्याने थेट पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.
हेही वाचा : LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..