नाशिक- एकीकडे मालेगाव शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना दुसरीकडे महानगरपालिकेतील सावळागोंधळ समोर आला आहे. शहरात आरोग्य सेवेतील डॉक्टर, सफाई कर्मचारी यांच्यासाठी महापालिका प्रशासनाने पीपीई किट व सुरक्षा साहित्य खरेदी केले होते. मात्र, हे साहित्य उपयोगी लावण्या ऐवजी ते पालिकेच्या वाडिया रुग्णालयाच्या भांडार कक्षातच पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सुरक्षा साहित्य मिळाले नसल्याची तक्रार डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यावर महापालिका आयुक्त त्र्यंबक कासार यांनी माहापालिकेचे अधिकारी व डॉक्टरांसह पालिकेच्या वाडिया रुग्णालयाच्या भांडार कक्षाची पहाणी केली. यावेळी भांडारात साडेतीन हजार पीपीई किट, २० हजार मास्क, २ हजार एम-९५ मास्क, फेसशिल्ड मास्क, सॅनिटायझर, थर्मल मीटर, औषधी गोळ्या असे सामान पडून असल्याचे आयुक्तांना दिसून आले. हा धक्कादायक प्रकार पाहून या सुरक्षा साहित्याच्या वितरणाची जबाबदारी असलेले भांडारपाल राहुल ठाकूर व कदीर नामक कर्मचऱ्याला नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहे.
हेही वाचा- कोरोनामुळे 20 वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू, नाशिक शहरातील पहिला बळी