नवी मुंबई /नाशिक - सतत अभ्यास कर म्हणून तगादा लावणाऱ्या आईला पोटच्या मुलीनेच कापडी पट्ट्याने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली आहे. आईचा खून केल्यानंतर मुलीने आईच्या आत्महत्येचा केल्याचा बनाव देखील केला होता. मात्र, तपासाअंती 15 वर्षाच्या मुलीनेच आईला मारून टाकल्याचे समोर आले आहे. नाशिकमध्येही काहीशी अशीच घटना समोर आली आहे. एक 32 वर्षीय महिलेने आपल्या साडे वर्षीय मुलाचा उशीच्या सहाय्याने गळा दाबून खून केला व नंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितले की मुलाकडून आईच्या खूप अपेक्षा होत्या.
ठाण्याच्या घटनेत मुलीवर डॉक्टर होण्यासाठी आईवडिलांचा दबाव -
ऐरोलीमधील सेक्टर 7 येथील राकेश सोसायटीत शिल्पा जाधव (40) व संतोष जाधव (44) हे दाम्पत्य राहत होते. त्यांना 15 वर्षाची मुलगी व 6 वर्षांचा मुलगा आहे. आपली मुलगी डॉक्टर व्हावी अशी या दांपत्याची इच्छा होती. म्हणून त्यांनी मुलीला मे महिन्यात नीटचा क्लास लावला होता. मुलीने नीटची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करावी म्हणून मुलीची आई शिल्पा ही सतत मुलीवर अभ्यासासाठी दबाव आणीत होती. त्यामुळे सतत दोघींमध्ये भांडणही होत होती.
आपल्या मुलीने सतत अभ्यासात व्यस्त राहावे म्हणून आईवडील मुलीवर दबाव टाकत होते. त्यातच 27 जुलैला मुलीने मोबाईल घेतल्याने वडील संतोष हे तिला ओरडले होते. त्यामुळे ती रागावून जवळच राहणारे मुलीचे मामा शैलेश पवार यांच्या घरी गेली होती. संध्याकाळी शिल्पा या मुलीची समजूत काढण्यासाठी भावाच्या घरी गेली असता तिने मुलीने आईसोबत वाद घातला. तेव्हा मुलीने आई शिल्पा व वडील संतोष यांच्या विरूद्ध पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली. त्यामुळे शिल्पा यांनी मुलीला रबाळे पोलीस ठाण्यात नेले. आई-वडिलांची समजूत काढून त्यांना घरी पाठवून दिले.
30 जुलैला मृत शिल्पा यांचे पती घराबाहेर गेल्यानंतर घरामध्ये त्या, त्यांची मुलगी व मुलगा घरात होते. दुपारी शिल्पा यांनी मुलीला अभ्यासावरुन रागावून तिला मारहाण केली. यावेळी त्यांनी हातात सुरी देखील घेतली. याचाच मुलीला आईचा राग आला. आई आणि मुलगी एकमेकींना करत असलेल्या हाणामारीत आईने मुलीच्या हाताला चावा घेतला, आणि मुलीने आईला ढकलून दिले. यात शिल्पा खाली पडल्या. व त्यांच्या डोक्याला बेड लागला. अशातच त्यांच्या मुलीने कराटेचा कापडी पट्टा गळ्याभोवती घट्ट आवळला. शिल्पाने हालचाल बंद होईपर्यंत तसाच धरुन ठेवला. त्यानंतर शिल्पा मृत झाल्याची खात्री झाल्यावरच त्यांच्या मुलीने पट्ट्याची पकड सैल केली.
आत्महत्येचा केला बनाव
आईचा खून केल्यानंतर हा प्रकार आत्महत्येचा वाटावा म्हणून शिल्पा यांच्या मुलीने बेडरुमच्या दरवाजाला बाहेरुन असलेली चावी काढली. ती शिल्पा यांच्या बेडरुममध्ये ठेवली. त्यानंतर मुलीने शिल्पा यांचा मोबाईल घेऊन मुलीने तिचे वडील, मामा, मावशी यांना मी माझे आयुष्य संपवित आहे. असा शिल्पा यांच्या नावे इंग्रजीत व्हॉटसऍपवर मेसेज पाठवला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व शिल्पा जाधव यांचा मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनात शिल्पा जाधव यांचा मृत्यू डोक्याला गंभीर दुखापत व गळा आवळल्यामुळे झाल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी तपास करण्यासाठी मृत शिल्पा जाधव यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरु केली. या चौकशीत पोलिसांनी मुलीकडे विचारपूस केली असता, चौकशीत तिनेच आईची हत्या केल्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी मुलीवर खून आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे. मुलगी ही अल्पवयीन असल्याने तिची रवानगी बालसुधारगृहात होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नाशिकच्या घटनेत आईकडून मुलाची हत्या व नंतर स्वत: केली आत्महत्या -
नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात गळफास घेत महिलेने आत्महत्या केली असून पोलिसांना साडेतीन वर्षीय मुलाचा देखील मृतदेह घरात आढळून आला आहे. मुलाचा खून करून महिलेने आत्महत्या केली असावी अशी अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याबाबत इंदिरानगर भागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत महिलेचे नाव शिखा सागर पाठक आहे तर मुलाचे नाव रिधान असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिखा सागर पाठक वय (32 रा साई सिद्धी अपार्टमेंट पाथर्डी फाटा) त्यांच्या राहत्या घरात आई-वडील हॉलमध्ये बसलेले असताना बेडरूमचा दरवाजा बंद करून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी मुलगा रिधानचा उशीने गळा दाबून खून केला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळून आली आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, शिखा बेडरुमचे दार बंद करून रिधानचा अभ्यास घेत होती. खूप वेळ झाला तरी दार उघडले नाही म्हणून बाहेरच्या रुममध्ये बसलेल्या शिखाच्या आई-वडिलांनी आवाज दिला. मात्र आतून काहीच प्रतिसाद न आल्याने त्यांनी जावयाला फोन करून बोलावले. त्यांनी घराचा दरवाजा तोडला असता आतमध्ये शिखा व रिधान मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी सांगितले की, शिखाच्या रिधानच्या अभ्यासाबाबत खूपच अपेक्षा होत्या. त्यातून ती तापट स्वभावाची होती. त्यामुळे तिने आधी उशीने तोंड दाबून रिधानचा खून केला व नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.