नाशिक - गेल्या दहा ते बारा दिवसात चांगल्या प्रयत्नानंतर नाशिक जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. कोरोना विरोधातील लढाई ही दीर्घ काळ चालणारी आहे. येणाऱ्या काळात कोरोना रुग्ण दाखल होतील आणि कोरोनामुक्त देखील होतील. ही निरंतर चालणारी प्रक्रिया असेल. त्यामुळे कोरोना विरोधातील लढा त्यासोबत सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन व्यवहार व अर्थकारण सुरळीत राहतील, यासाठी आता प्रशासनाने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केल्या आहेत.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले, संपूर्ण जग बंद, देश बंद, राज्य बंद आणि जिल्हा बंद अशा सारख्या उपाययोजनामधून कोरोना रोगासारख्या आजाराशी लढताना प्रथमच असा अनुभव आला आहे. अशा परिस्थितीत नाशिक जिल्हा कालपर्यंत हाताबाहेर जाणारी मालेगावची स्थिती आटोक्यात आली आहे. येथील रुग्ण कोरोनामुक्त होत असून नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे. नाशिक शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी असून आपण लवकरच यातून बाहेर पडू असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील कोरोना साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन योग्य काम करत असून, डॉक्टरांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. नेमून दिलेल्या उपचार विलागीकरण केंद्रात पूर्ण केल्यानंतर, आजराची कोणतेही लक्षणे नसलेल्या रुग्णांना विलगीकरण कक्षात रहाण्याची आता आवश्यकता नसल्याने नवीन डिस्चार्ज धोरणामुळे अशा व्यक्तींना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यामुळे कोरोना विरोधातील लढा त्यासोबत सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन व्यवहार व अर्थकारण सुरळीत राहतील. यासाठी आता प्रशासनाने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हा आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.