नाशिक - कोरोना काळात मास्क, सॅनिटायझर, रेमडिसिवीर या औषधांची काळ्याबाजारात विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली. मागील दोन महिन्यात करण्यात आलेल्या कारवाईत नाशिक शहर आणि जिल्ह्यातील एकूण 61 औषध दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
दुकानांमध्ये अधिकृत फार्मासिस्टची नियुक्ती न करणे, दुकानांचे परवाने अवैध असणे, यांसह विविध कारणांसाठी नाशिक शहरातील 44 तर ग्रामीण भागातील 17 दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती सहआयुक्त माधुरी पवार यांनी दिली.
दरम्यान शासनाचे निर्देश असताना देखील अनेक ठिकाणी मास्क चढ्या दराने विकले जात होते. संबंधित कारवाईत ही बाब देखील उघड झाली आहे. तर मालेगावमध्ये पोलीस आणि अन्न औषध विभागाने टाकलेल्या छाप्यात गर्भपाताच्या औषधांचा हजारो रुपये किंमतीचा औषधसाठा देखील जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे आता जिल्हाभरातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या औषध विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
अन्न व औषध, सौंदर्यप्रसाधने कायद्याच्या नियमानुसार अधिकृत फार्मासिस्ट पदवी प्राप्त व लायसन्सधारक विक्रेत्यांच्या उपस्थितीतच औषधांची विक्री करणे बंधनकारक आहे. मात्र असे असतानाही तपासणीत 12 ठिकाणी फार्मासिस्ट नसताना नियमबाह्य विक्री सुरू असल्याचे दिसून आले. शासनाच्या निर्देशानुसार मास्क हे निर्धारित किमतीला न विकल्याने तीन दुकानदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, मालेगाव येथे दुकानात अवैधरित्या गर्भपाताच्या औषधांचा साठा सापडल्याने आझादनगर पोलिसांसमवेत छापा टाकून एक लाखांचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे.