नाशिक - श्रीकृष्णाच्या भक्तांसाठी जन्माष्टमी म्हणजे एक पर्वणीच असते. यादिवशी अनेक घरांमध्ये भजन, किर्तन, गवळणी आणि गाण्याचे कार्यक्रम होतात. त्यासोबतच काही घरांमध्ये या दिवशी श्रीकृष्ण लीलांचा पर्यावरण पूरक शाडू मातीचा देखावा ही साकारला जातो. असाच एक देखावा विश्वास जोशी यांनी आपल्या घरात साकारला आहे.
वैष्णव भक्त विश्वास जोशी यांच्या घरी परंपरेनुसार जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्ण महिमा सांगणारा देखावा साकारण्याची परंपरा आहे. श्री कृष्णाबद्दल असलेल्या श्रद्धेतून जोशी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रित येत पर्यावरण पूरक शाडू मातीतून देखावा उभा करतात. या देखाव्यात ते कृष्ण चरित्र, कृष्ण जन्म, पुतना वध, श्री कृष्णाचे गोकुळ आणि बालपणी मुरलीधरावर झालेले संस्कार यातून दाखवले आहेत.
जोशी यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वीच्या काळी श्री कृष्णाबद्दल देखाव्यातून लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे हा एक चांगला पर्याय होता. मात्र, आता कालांतराने वृत्तपत्रे, टीव्ही चॅनल, सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठलीही माहिती काही सेकंदात मिळू शकते. पण असे असले तरी परंपरेनुसार चालत आलेल्या देखावा साकारण्यातून एक परिवार तर एकत्र येतोच मात्र, आत्मिक समाधान देखील मिळत असल्याचे ते सांगतात.