नाशिक - हिंदू पंचांगानुसार गुरुवारी पितृपक्ष पंधरवाड्याची सांगता झाली आहे. आजच्या दिवशी पितरांची मृत्यू तिथी माहिती नसलेले लोक पूर्वजांचे श्राद्ध घालत असतात. यामुळे सर्वपित्री अमावस्येचा मुहूर्त साधत अनेकांनी गोदाघाट परिसरात श्राद्धविधी आणि काक घासासाठी गर्दी केल्याचे बघायला मिळाले.
हिंदू पंचांगाप्रमाणे भाद्रपद महिन्याचा शेवटच्या दिवसाला 'सर्वपित्री अमावस्या' किंवा 'पितृमोक्ष अमावस्या' असे म्हणतात. ज्या लोकांना आपल्या पितरांची मृत्युतिथी नक्की माहिती नसते असे धार्मिक प्रवृत्तीचे लोक आजच्या दिवशी पितरांचे श्राद्ध घालतात, किंवा निदान, कावळ्यासाठी वाढलेल्या पचपक्वान्नचे ताट ठेवतात. नाशिक शहरातील गोदा घाटावर देखील अनेकांनी श्राद्ध घालण्यासाठी आणि काक घासासाठी गर्दी केल्याचे बघायला मिळाले. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे अगदी तुरळक प्रमाणात श्राद्धविधीसाठी लोक दाखल झाल्याने कोरोनाचा प्रभाव यावर्षी पितृपक्षावर देखील असल्याचे पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी आजच्या सर्वपित्री अमावस्येचे महत्व सांगितले आहे.
दरम्यान, सर्वपित्री अमावस्या संपल्यानंतर पितृपक्ष पंधरवाड्याची सांगता होणार असून, उद्यापासून हिंदू संस्कृतीमध्ये विशेष महत्व असलेल्या अधिक मासाला सुरुवात होणार आहे. अधिकस्य अधिक फलम म्हणजे अधिक महिन्यात चांगले कार्य केल्यास त्याचे फळही अधिक मिळते असा समज असल्याने या महिन्यात विवाह, गृहप्रवेश यासारखे विधी वगळता इतर सर्व कार्य संपन्न होत असतात. अधिक महिना तीन वर्षातून एकदाच येत असल्याने या महिन्यात सर्वच क्षेत्रांमध्ये कोट्यवधींची उलाढाल होत असते. मात्र, यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने या महिन्यावर देखील कोरोनाचे सावट बघायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.