नाशिक - स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात सुरू झालेली पार्किंग आणि स्मार्ट रस्त्यांच्या कामाला होत असलेला विलंब, यांमुळे सर्वसामान्य नाशिककरांना भविष्यात फायदा होण्याऐवजी त्रासच अधिक होणार असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आल्याची माहिती काँग्रेस प्रवक्त्या व नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी दिली आहे. त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांबद्दल लोकांची मते जाणून घेण्यासाठी आपण दोन लाख लोकांपर्यंत पोहोचणार आहोत. स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात ऑनलाइन व ऑफलाईन पार्किंग प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. परंतु त्या पार्किंगवर भाई दादांचेच वर्चस्व असल्याचे निदर्शनास येते. यामुळे स्मार्ट सिटीतील एकूणच प्रकल्पांबाबत जनजागृती शिवाय पर्याय नाही, असे डॉ. हेमलता पाटील म्हणाल्या. एवढेच नाही, तर स्मार्ट सिटी प्रकल्प खरोखर लोकांच्या उपयोगाचा आहे का? याचा आढावा आपण लोकांमध्ये जाऊन घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.