नाशिक - 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ जयंत नारळीकर यांची निवड झाली आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पाहिल्यांदाच जयंत नारळीकर यांच्या रूपाने वैज्ञानिक साहित्यिकाला संधी मिळाली आहे. दरम्यान, या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री छगन भुजबळ यांची निवड झाली आहे. आज स्वागताध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी त्यांची भेट घेऊन सन्मान केला.
नाशिककर म्हणून मला अतिशय आनंद-
स्वागताध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकमध्ये होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी साहित्य मंडळाने केलेली माझी निवड हा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान आहे. कविवर्य कुसुमाग्रज, वसंत कानेटकर यांनी वास्तव केलेल्या पुण्यभूमीत यंदा मराठी साहित्यिकांचा मेळा भरत आहे. याचा एक नाशिककर म्हणून मला अतिशय आनंद आहे. तसेच या संमेलनाच्या अध्यक्षपदी आपण ज्येष्ठ शास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ.जयंत नारळीकर यांची निवड केली आहे. या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माझी निवड करण्यात आली हा माझ्यासाठी मी सर्वोच्च असा सन्मान समजतो.
मराठी साहित्य संमलेन उत्कृष्ट पद्धतीने पार पाडले जाईल-
तसेच नाशिकमध्ये होणारे हे साहित्य संमलेन नक्कीच ऐतिहासिक होईल. यात कुठलीच शंका नाही. नाशिककर म्हणून या अगोदरच आपण जबाबदारी स्विकारली आहे. आता स्वागताध्यक्ष म्हणून आपण माझ्यावर सोपवलेली जबाबदारी स्विकारण्यास मी तयार असून नाशिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे, साहित्यिकाचे व मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या तमाम नागरिकांचे या नाशिक नगरीत स्वागत करण्यास आपण कुठलीही कमतरता राहू देणार नाही. तसेच आपणा सर्वांच्या सोबतीने हे मराठी साहित्य संमलेन उत्कृष्ट पद्धतीने पार पाडले जाईल, असा विश्वास व्यक्त करतो, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
आमदार हेमंत टकले म्हणाले...-
यावेळी बोलताना माजी आमदार हेमंत टकले म्हणाले की, साहित्य क्षेत्राची आवड असलेले आणि समाजसेवी व्रत जोपासणारे व्यक्ती म्हणून नाशिक येथे होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या स्वागताध्यक्षपदी आपली निवड करण्यात आली आहे. आपली झालेली ही निवड आमच्यासाठी अंत्यत आनंदाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन अध्यक्षपदी जयंत नारळीकर
94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पाहिल्यांदाच जयंत नारळीकर यांच्या रूपाने वैज्ञानिक साहित्यिकाला संधी मिळाली आहे. शेवटच्या क्षणी जयंत नारळीकर आणि भारत सासणे यांच्यात अध्यक्ष पदावरून रस्सीखेच सुरू होती. साहित्य मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची चार तास बैठक चालली होती, त्यात नारळीकरांच्या नावावर एक मत झाले.
नारळीकर यांच्या कार्याची दखल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली आहे. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 1965 साली त्यांना पद्मभूषण तर 2004 साली पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते. शिवाय डॉ. भटनागर स्मृती पारितोषिक, एम.पी. बिर्ला सन्मान आणि फ्रेंच अॅस्ट्रॉलॉजिकल सोसायटीचा पिक्स ज्यूल्स जेन्सनसारखे सन्मानही त्यांना प्राप्त झाले आहेत. लंडनच्या रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे ते सहाधिकारी आहेत, तर भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी आणि थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेसचे ते अधिछात्र आहेत. विज्ञान अकादमीच्या इंदिरा गांधी पारितोषिकानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. वैज्ञानिक विषयांत साहित्यिक लिखाण करून विज्ञानाचा प्रसार करण्यासाठीही त्यांना 1996 साली युनेस्कोने कलिंग पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला. साहित्य संमेलन नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटी महाविद्यालयाच्या पटांगणात 26 ते 28 मार्चला होणार आहे.
हेही वाचा- राज्यात सर्वच ठिकाणी आंदोलन व्हायला हवे होते, पण.. - उपमुख्यमंत्री