नाशिक - रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेण्यास उशीर झाल्याने एका कॅन्सरग्रस्त कोरोना योद्ध्याने रिक्षातच प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना नवीन नाशिक भागात घडली. नाशिक शहरात सध्या कोरोनाने थैमान घातल आहे. यामुळे कोरोना रुग्णांना वेळेत उपचार मिळावे म्हणून प्रशासनाने जवळपास शहरातील 70% हुन अधिक खासगी रुग्णालयाने अधिग्रहित केली आहेत. मात्र यामुळे आता इतर आजार असलेल्या रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याचे या प्रकरणातून समोर येत आहे. नंदू सोनवणे असे त्या मृताचे नाव आहे. ते नाशिक महापालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून सेवेत होते.
रुग्णालयात दाखल करून घेण्यास झाला उशीर -
शहरातील नवीन नाशिक भागात राहात असलेले सफाई कर्मचारी नंदू सोनवणे यांना कर्करोग झाला होता. त्यामुळे ते गेल्या पाच महिन्यांपासून रजेवर होते. दरम्यान, रविवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन ते तीन रुग्णालय फिरून सुद्धा त्यांना एकाही रुग्णालयात दाखल करून घेतले नाही. अखेर नवीन नाशिकमधील सुविधा रुग्णालयाबाहेरच त्यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला. असा आरोप मृत सोनवणे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. सुविधा रुग्णालयाबाहेरून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून सोनवणे यांना मृत घोषित केले. तसेच त्यांची कोरोना चाचणी केली असता, त्याचा अहवाल देखील निगेटिव्ह आला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.