नाशिक - राज्यभरात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे. नाशिक जिल्ह्यातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण जिल्हा 12 ते 22 मे दरम्यान कडकडीत बंद करण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचा निर्णय, केवळ वैद्यकीय कारणांसाठी पडता येणार बाहेर
कोरोना रुग्णांचा आलेख खाली उतरत नसल्याने जिल्ह्यात 12 ते 22 मे असा दहा दिवसांचा कडक लाॅकडाऊन लावण्यात आला आहे. किराणा दुकाने सकाळी 7 ते दुपारी 12 या कालावधीत फक्त घरपोच सेवेसाठी खुली राहणार असून भाजीपाला विक्रेत्यांनाही या कालावधीतच विक्री करता येईल. वैदयकिय कारणाव्यतिरिक्त घराबाहेर पडण्यास मज्जाव असून नियमाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हाप्रशासनाने दिली आहे.
'लॉकडाऊनमध्ये कुणीही नियमांचे उल्लंघन करू'
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी सुरज मांढरे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्यासह विविध शासकीय अधिकारी यांची बैठक पार पडली यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील दहा दिवस केवळ वैद्यकीय कारणांसाठी नाशिककरांना घराबाहेर पडता येणार आहे. पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला असला तरी रुग्ण संख्या कायम आहे. रुग्णसंख्येमध्ये अपेक्षित घट होत नसल्याने असल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला आहे. बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर, ऑक्सिजनचाप्रचंड तुटवडा आहे. दररोज कोरोनाने मृत्यूची संख्या वाढत असून स्मशान भूमीत अत्यंविधीसाठी रांगा लागल्या आहेत. रुग्णसंख्या वाढ कमी न झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊन आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची भिती आहे. जिल्ह्यात कठोर निर्बंध असताना देखील नागरिक कोरोनाचे गांभीर्य घेत नाही, रस्त्यांवर गर्दी करत असल्याने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे लॉकडाऊन दरम्यान कोणीही नियमांचे उल्लंघन करू नये असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
सरकारी अस्थापना 15 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू
दरम्यान खासगी आस्थापना पूर्णपणे बंद राहणार असून सरकारी अस्थापना 15 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू ठेवण्यात येणार आहे. सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत भाजीपाला विक्री करता येणार आहे. लग्नसमारंभासाठी केवळ नोंदणी पद्धतीने पाच लोकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली असून जिल्ह्यातील एकोणावीस बाजार समित्या पुढील दहा दिवस बंद राहणार आहे. अत्यावश्यक सुविधांची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी यादरम्यान देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या या लोकांमुळे तरी आता जिल्ह्यातील प्रादुर्भाव नियंत्रणात येण्यास मदत होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
- हे राहणार सुरू
- लसीकरण केंद्रे करोनाविषयक सर्व प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करून सुरू राहतील.
- किराणा दुकाने, बेकरी, मिठाई व तत्सम दुकाने तसेच पाळीव प्राण्यांच्या जीवनावश्यक बाबींची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 12 याकालावधीत केवळ घरपोच सेवा देण्यासाठी सुरू राहतील. मागणीप्रमाणे दुकानदार माल घरपोच पोहोचवण्याची व्यवस्था करतील.
- दुध संकलन केंद्रे व घरपोच दुध वितरण व्यवस्था यांना संकलन व घरपोच विक्रीसाठी सकाळी 7 ते 12 आणि संकलनासाठी सायंकाळी 5 ते 7 परवानगी राहील.
- हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, मद्यविक्री केंद्रे यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी 7 ते दुपारी 12 व सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत सुरु राहील. ग्राहकास या आस्थापनांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
- शिवभोजन थाळी केंद्र सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरु राहील. केवळ पार्सलद्वारे अन्नपदार्थ वितरित होतील. तेथे बसून भोजन करणे प्रतिबंधित राहील.
- शासकीय रास्त भाव दुकाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांप्रमाणे सुरू राहतील.
- जिल्हयातील सर्व कृषी उत्पनबाजार समित्या बंद राहतील. शेतकर्यांना मालाची विक्री करण्याच्या दृष्टीने पर्यायी व्यवस्था विकेंद्रित पद्धतीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीची राहील.
- सर्व भाजी मार्केट आणि आठवडी बाजार बंद राहतील. रस्त्याच्या कडेला सुरक्षित अंतरावर आखणी करून देऊन सकाळी 7 ते 12 या वेळात भाजी, फळे विक्री करण्यासाठी जागा निश्चित करून देण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची राहील. फिरत्या हातगाडी वरून वरील वेळेतच भाजीपाला व फळे विक्री करण्यास परवानगी राहील.
- औषध निर्मिती व ऑक्सिजन निर्मिती वगळता अन्य उद्योग केवळ इन सिटू पद्धतीने सुरू राहतील. या आस्थापना चालकांनी कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करावा व या मनुष्यबळाची निवास भोजन व्यवस्था कामाचे ठिकाणी अथवा नजीकच्या ठिकाणी करावी.
- औद्योगिक व इतर वस्तुंची पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक अशी स्थानिक आंतर जिल्हा, आंतरराज्य वाहतुक, शासकीय नियमानुसार सुरु राहिल. कच्च्या व पक्क्या मालाची वाहतुक निरंतर करता येईल. नाशिक जिल्ह्यातुन इतर जिल्हयात जाणाऱ्या माल वाहतुक वाहनांना प्रवेश राहील.
- सर्व प्रकारची बांधकामे केवळ इन सिटू पद्धतीने सुरू राहतील. या आस्थापना चालकांनी कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करावा व या मनुष्यबळाची निवास व भोजन व्यवस्था कामाचे ठिकाणी अथवा नजीकच्या ठिकाणी करावी. या सर्व मनुष्यबळाचे दर दहा दिवसानंतर रॅपिड अॅटींजन टेस्ट करणे देखील अनिवार्य राहील.
- कृषी अवजारे व शेतातील उत्पादनाशी संबंधीत दुकाने सकाळी 7 ते सकाळी 12 या वेळेत सुरू राहतील.
- अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 व्यक्ती व तदनंतरचे विधीसाठी जास्तीत जास्त 15 व्यक्तीइतकी उपस्थितीची मर्यादा राहील.
- खाजगी व सार्वजनीक वैद्यकीय सेवा, पशुचिकीत्सक सेवा, त्यांचे नियमीत वेळेनुसार सुरू राहील.
- मेडीकल स्टोअर्स व दवाखाने तसेच ऑनलाईन औषध सेवा 24 तास कालावधीत सुरू राहतील.
- हे राहणार बंद
- सर्व सामान्यांच्या वाहनांना पेट्रोल व डिझेल बंद राहील. परवानगी दिलेल्या वाहनांसाठीच पेट्रोल वितरित करण्यात यावेत. माल वाहतूक, रुग्णवाहिका, शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, परवानगी पास असलेली वाहने यांच्यांकरीता पेट्रोल-डिझेलची उपलब्धता करुन द्यावी
- सर्व चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरणतलाव, करमणुक व्यवसाय नाटयगृह, कलाकेंद्र, प्रेक्षकगृहे, सभागृहे संपुर्णत: बंद राहतील.
- शाळा महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारची शिकवणी वर्ग संपुर्णतः बंद राहतील.
- सर्व प्रकारचे स्वागत समारंभ हॉल, मंगल कार्यालये, लॉन व तत्सम ठिकाणे हे पूर्णत: बंद राहतील. लग्न समारंभ करावयाचा असल्यास नोंदणी पद्धतीने विवाह नोंदणी कार्यालयात करण्यात यावा. यावेळी पाच व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही.
- ग्राहकांनी गॅस एजन्सीमध्ये प्रत्यक्ष येऊन गॅस नोंदणी करण्यास अथवा सिलेंडर घेण्यास प्रतिबंध राहील. गॅस एजन्सी येथे ग्राहक आढळून आल्यास संबधित एजन्सी कारवाईस पात्र राहील.
- शासकीय कार्यालये अभ्यागंतासाठी पुर्णतः बंद ठेवण्यात येत आहेत. अत्यावश्यक कामासाठी संबंधित कार्यालयाचे ई-मेल अथवा दूरध्वनी सुविधेचा वापर करावा.
- सेतू व आपले सरकार सेवा केंद्र अभ्यागतांसाठी बंद राहतील. पुर्णतः ऑनलाईन असलेल्या सेवा सुरू राहतील.
- सार्वजनिक तसेच खासगी बस वाहतुक, रिक्षा चारचाकी व दुचाकी वाहने यांची वाहतुक नागरिकांना अत्यावश्यक कामाकरीता फक्त अनुज्ञेय राहील.
- जिल्हयाच्या माल वाहतुक व रुग्ण वाहतूक करणाऱ्या वाहनास व शासकीय वाहनास स्वतंत्र परवानगीची गरज असणार नाही. तथापि मालवाहतूक साठा, खतसाठा इ. बाबतीत फक्त लोडींग व अनलोडींग करण्यास परवानगी अनुज्ञेय राहील. इतर कारणांकरीता व आवश्यक वैद्यकीय कारणांकरीता जिल्हयाबाहेर व आंतरजिल्हा वाहतूक करावयाची असल्यास https://covid19.mhpolice.in/ यावेबसाईटवरुन ई-पास काढून वाहतूक करता येईल.