नागपूर - जिल्ह्यातील ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीज बिल माफीच्या नावाने फसवणूक करण्याचे काम केल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष वामनराव चटप यांनी केला आहे. ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्या साधत नागपूरच्या इतवारी परिसरातील विदर्भ चंडिका माता मंदिर परिसरात आजपासून (सोमवार) बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरूवात केली आहे. शहिद स्तंभाला वंदन करत या आंदोलनाची सुरूवात करण्यात आली.
'मोदी सरकारला बुद्धी दे'
मोदी सरकारच्या विरोधात हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. कारण वेगळे राज्य निर्माण करण्याचा अधिकार हा केंद्रात असलेल्या भाजपाचा सरकारचा असल्याने त्या विरोधात हे आंदोलन सुरू करण्यात आले असल्याचे वामनराव चटप यांनी सांगितले आहे. हे आंदोलन बेमुदत असून यामध्ये विदर्भाच्या विविध जिल्ह्यातील नागरिक सहभागी होणार आहे. महाराष्ट्र्र सरकार आर्थिकदृष्ट्या मृत पावले आहे. राज्यावर उत्पन्नाच्या तुलनेत मोठे कर्ज आहे, यामुळे विदर्भ हा महाराष्ट्रात 100 वर्ष सोबत राहिला तरी विकास होऊ शकत नाही, यामुळे विदर्भ राज्य वेगळे झाले पाहिजे, ही मागणी आहे. या मोदी सरकारला बुद्धी दे, असे म्हणत चंडिका मंदिरात यावेळी पूजा करण्यात आली.
'या' आहेत मागण्या
या आंदोलनातून वेगळ्या विदर्भासह शेतकऱ्यांचे कृषी पंपांचे वीज बिल माफ करावे. कोरोना काळात आश्वासन दिलेले किमान 200 युनिट वीज बिल माफी करावे, मागील काही दिवसात वाढलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरवादीमुळे नागरिक हौरण झाल्याने ही दरवाढ मागे घ्यावी, अशीही मागणी या ठिय्या आंदोलनाच्या माध्यातून करण्यात आली आहे. भाजपाने 2014 मध्ये महाराष्ट्रात सत्ता आल्यावर वेगळा विदर्भ देण्याचे आश्वासन दिले होते. पण सत्तेत आल्यावर मात्र त्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. झारखंड, छत्तीसगढ, उत्तरांचल हे राज्य वेगळे केले. मात्र विदर्भ वेगळा झाला पाहिजे, या मागणीकडे दुर्लक्ष केला जात असल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजन राम नेवले यांनी सांगितले. यावेळी मोठ्या संख्यने विदर्भातील वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
हेही वाचा - कोल्हापुरातील शिरोळमध्ये पूरग्रस्तांचा आक्रोश; 52 गावातील ग्रामस्थांची तहसील कार्यालयावर धडक