नागपूर - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले मंत्र लक्षात ठेवून स्वराज्यला सुराज्यात बदलायचे आहे. रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म हे सूत्र लक्षात घेऊन काम करायचे आहे. लोकांच्या जीवनात परिवर्तन आणायचे आहे. या प्रणालीत परिवर्तन घडवून या परिवर्तनाचे प्रणेते बनायचे असल्याचे मार्गदर्शन उपराष्ट्रपती नायडू ( Venkaiah Naidu News Nagpur ) यांनी केले. भारतीय महसूल सेवा अधिकाऱ्यांच्या 74 व्या दीक्षांत समारंभात उपस्थित ( Venkaiah Naidu at NADT Nagpur ) असताना ते बोलत होते.
हेही वाचा - Dilip Walase Patil : राज्यात 7 हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरु होणार; गृहमंत्र्यांची माहिती
कर हा केवळ सरकारसाठी महसुलाचा स्त्रोत नसून सामाजिक - आर्थिक विकासाचे उदिष्ट साध्य करण्याचेही महत्वाचे साधन असल्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणालेत. कोविडच्या महामारीत जागतिक अर्थव्यवस्था बाधित झाली असून, आता हळूहळू त्यातून बाहेर पडत आहोत. भारताचा आर्थिक विकास दरही प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक आहे. यापुढच्या काळात नव्या अधिकाऱ्यांनी जगभरातील चांगल्या कार्यपद्धतींचे अनुकरण करून देशातील व्यवस्थेत कल्पक आणि नाविन्यपूर्ण बदल घडवावे, असेही उपराष्ट्रपती व्यंकया नायडू म्हणालेत. ते नागपुरात राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत आयआरएस अधिकाऱ्यांच्या 74 व्या तुकडीच्या प्रशिक्षण समारोपाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
करप्रणाली सुलभ करण्याच्या गरजेवर भर देताना उपराष्ट्रपती म्हणाले, भारतीय महसूल सेवेकडून प्रत्यक्ष कर संकलित करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम केले जाते. यात अनुकूल पद्धतींद्वारे गोळा करण्याची गरज असते. अलीकडच्या काळात करदात्यांसाठी स्नेहदायी अशी कार्यपद्धती निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार आणि शासनाकडून केले जात असल्याचेही व्यंकय्या नायडू म्हणालेत. करदाते आणि कर प्रशासक यांच्यात परस्पर संवाद, विश्वास, पारदर्शकता, साधली गेली पाहिजे, असेही ते म्हणाले.
नवल कुमार जैन या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याने अर्थ मंत्री सूवर्ण पदकासह विविध विषयातील प्राविण्य मिळवून 7 सूवर्ण पदक प्राप्त केली. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते त्यांना ही पदके प्रदान करण्यात आली. भारतीय महसूल सेवेच्या 74 व्या तुकडीमध्ये 54 अधिकारी भारतीय महसूल सेवेतील असून दोन अधिकारी रॉयल भूतान सर्व्हिसचे आहेत. 21 महिला अधिकारी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर देशभरातील आयकर कार्यालयात सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्त केल्या जातील.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष जे.बी. मोहपात्रा, केंद्राचे प्रधान महासंचालक प्रवीणकुमार आदींची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती.