नागपूर - शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने तीन ड्रग्स तस्करांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 82 ग्रॅम 84 मिली ग्रॅम एमडी ड्रग्स पावडर जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या एमडी ड्रग्सची किंमत 8 लाख 28 हजार 400 रुपये इतकी आहे. याशिवाय आरोपींकडून मोबाइल आणि कारसुद्धा जप्त करण्यात आली असल्याने एकूण जप्त मुद्देमाल हा ११ लाख ५५ हजार रुपयांचा झाला आहे. अंकित राजकुमार गुप्ता (२८), रितीक गुप्ता (२०) आणि रूपम प्रभाकर सोनकुसरे अशी अटक करण्यात आलेल्या ड्रग्स तस्करांची नावे आहे. तीनही अटक आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे या सर्वांना ड्रग्स पुरविणाऱ्या मुंबई येथील मामू नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
एनडीपीएसच्या पथकाने रचला सापळा
अंमली पदार्थविरोधी पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती, की गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाभा नाका ते नवीन काटोल नाका चौकाकडे येणाऱ्या रिंग रोडवर असलेल्या झोपडपट्टी भागात अंकित राजकुमार गुप्ता, रितीक गुप्ता आणि रूपम प्रभाकर सोनकुसरे हे तिघे ड्रग्सविक्री करत आहेत. या माहितीच्या आधारे एनडीपीएसच्या पथकाने सापळा रचून तीनही आरोपींना शिताफीने अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून ८२ ग्रॅम ८४ मिली ग्रॅम एमडी ड्रग्स पावडर जप्त केली, ज्याची किंमत ८ लाख २८ हजार ४०० रुपये इतकी आहे. याशिवाय गुन्ह्यात उपयोगात आणलेली एक कार आणि तीन मोबाइलसुद्धा पोलिसांनी जप्त केले आहेत. एकूण जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत ११ लाख ५५ हजार रुपये आहे.
मुख्य आरोपीला मुंबई येथून अटक
अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केलेल्या तीनही आरोपींची चौकशी केली तेव्हा त्यांनी ड्रग्स मुंबई येथील मामू नावाचे इसमाने पुरावल्याची माहिती उघड केली. त्यानंतर एनडीपीएसच्या एका पथकाला मुंबईला रवाना करण्यात आले. तांत्रिक मदतीने आरोपीचा मुंबई शहरात विविध ठिकाणी शोध घेण्यात आला, तेव्हा आरोपी मेहंदी हाशमी नजमूल सैय्यद उर्फ मामूला मालाड भागातून अटक करण्यात आली आहे.