नागपूर : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद आज महाराष्ट्रातही उमटले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर रस्त्यावर उतरले. देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा पुतळा जाळून निषेध केला.
नागपुरातील बेसा चौकात 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले व केंद्र सरकार विरोधात रोष व्यक्त केला. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची केंद्रसरकारने ताबडतोब दखल घेवून तोडगा काढावा या मागणीसाठी; तसेच महाराष्ट्रातील शेतकरी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या पूर्ण ताकदीने सोबत आहे हे दाखवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
अन्यथा आंदोलनाचा भडका उडेल - रविकांत तुपकर
केंद्राचे कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी लाखो शेतकरी दिल्लीत 6 दिवसांपासून ठाण मांडून आहेत. परंतु केंद्र सरकार मस्तीमध्ये आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहे. केंद्र सरकारने 3 दिवसात तोडगा न काढल्यास संबंध देशातील शेतकरी तर रस्त्यावर उतरतीलच; पण महाराष्ट्रातही आंदोलनाचा भडका उडवू असा इशारा रविकांत तुपकरांनी यावेळी दिला.
हेही वाचा : बॉलिवूडला साद घालण्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबईत येणार; उद्योजकांशीही करणार चर्चा