नागपूर - ऑगस्ट महिन्यात शहरातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. फक्त एका महिन्यात नागपुरात 23 हजार 893 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर ऑगस्ट महिन्यात 919 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ऑगस्ट महिना नागपूरकरांसाठी घातक ठरल्याचे चित्र आहे.
11 मार्चला नागपुरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर भीतीचे वातावरण असल्याने मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्यात येत होती. म्हणजेच जुलै महिन्यात रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली. अनलॉकच्या काळात सर्वाधिक रुग्ण सापडले आहे. सध्या ही संख्या हजारोंच्या आकड्याने वाढत आहे. कोरोनाने ऑगस्ट महिन्यात सगळे रेकॉर्ड मोडीत काढले. एक ऑगस्टला नागपुरात रुग्णांची संख्या 5 हजार 662 होती. तर त्यावेळी 139 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
पुढील 30 दिवसांमध्ये या आकड्यात खूप मोठी वाढ झाली आहे. 23 हजार 893 रुग्णांची वाढ होऊन हा आकडा 31 ऑगस्टपर्यंत 29 हजार 555 वर गेला आहे. तर 1 ऑगस्टला नागपुरात केवळ 139 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरच्या 30 दिवसात हा आकडा 919 ने वाढून 1 हजार 45 झाला आहे. सुरुवातीच्या चार महिन्यांत नागपुरात 5 हजार 393 रुग्ण होते. तर 126 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
मात्र ऑगस्ट महिन्यात नागपुरात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले असल्याने रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. नागपुरातील रुग्ण वाढ चिंताजनक असल्यानेच मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम चार सप्टेंबरला नागपुरात येणार आहे.
मुंबईत ज्या पद्धतीने रुग्ण वाढ रोखण्यात उपाययोजना करण्यात आल्या, त्या नागपुरात राबवण्यात येण्याबाबत सूचना देणार असल्याने येत्या काही दिवसांमध्ये नागपूरला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.