नागपूर - १४ दिवसांची संचित रजा मिळाल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला तब्बल पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रयत्नानंतर अटक करण्यात नागपूर शहरातील मानकापूर पोलिसांना यश मिळाले आहे. प्रमोद उर्फ भुर्या गंगारामजी गजभिये असे आरोपीचे नाव आहे. ७ ऑक्टोबर २०१५ला आरोपी भुऱ्याला विभागीय आयुक्तांच्या आदेशाने १४ दिवसांची संचित रजा मंजूर झाली होती. रजा पूर्ण झाल्यानंतर भुऱ्या हा कारागृहात परतण्याऐवजी पळून गेला होता. भुऱ्या गोरेवाडा भागात असल्याची माहिती समजताच मानकापूर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
प्रमोद उर्फ भुऱ्या गंगारामजी गजभिये याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. दरम्यान विभागीय आयुक्त नागपूर यांच्या आदेशान्वये आरोपीला ०७ ऑक्टोबर २०१५ला १४ दिवस संचित रजेवर आरोपीस सोडण्यात आले होते. रजा संपल्यानंतर २२ ऑक्टोबर २०१५ ला आरोपीने स्वताहुन मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे हजर होणे आवश्यक होते. मात्र, आरोपी हा पळून गेला होता. त्यानंतर वमध्यवर्ती कारागृह अधीक्षक नागपूर यांनी दिलेले लेखी पत्र फिर्यादी वरून आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या सर्व कारवाईला आता पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. याच दरम्यान मानकापुर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाला विश्वसनिय गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की मागील ५ वर्षापासून मध्यवर्ती कारागृह येथून फरार असलेला आरोपी प्रमोद उर्फ भुऱ्या गंगारामजी गजभिये हा सैलानी बाबा दर्गा , गोरेवाडा येथे असल्याची माहीती प्राप्त झाली. माहिती समाजात मानकापूर पोलीस ठाण्यातील तपास पथक हे सैलानी बाबा दर्गा येथे दाखल झाले तेव्हा आरोपीस त्या ठिकाणी आढळून आला. पोलिसांनी त्याला लगेच अटक केली आहे.
पाच वर्षांपासून सुरू होता लपंडाव -
आरोपी भुऱ्याला ०७ ऑक्टोबर २०१५ रोजी १४ दिवस संचित रजेवर आरोपीस सोडण्यात आले होते. त्यानंतर तो कधीही पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत हे माहीत असल्याने तो वेळो वेळी आपले ठिकाणदेखील बदलवत होता, त्यामुळे पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच तो पळून जायचा. मात्र यावेळी त्याचे नियोजन चुकल्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागला आहे