नागपूर - विदर्भासह राज्यावर ओढवलेल्या कोरोना महामारीच्या या संकटात नागरिकांच्या मदतीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रयत्न करताना दिसत आहेत. राजकीय हेवेदावे विसरून ते केवळ आणि केवळ जनसेवा करण्यावर भर देत आहेत. कोरोना महामारीच्या या काळात आपल्या विदर्भातील आरोग्य यंत्रणा कुठंपर्यंत टिकाव धरू शकते याची कल्पना आता सर्वांनाच आली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी गडकरी यांनी नवीन संकल्पना मांडली आहे. या संकल्पनेनुसार विदर्भाच्या दहा जिल्ह्यातील तालुका, नगरपरिषद आणि महानगरातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात प्राणवायू कॉन्संट्रेटर बँक तयार करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला आहे. या कामात धार्मिक आणि सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांसह अनेकांची मदत घेतली जाणार आहे.
ऑक्सिजन अभावी कुणाचाही जीव जाणे फार दुःखद आहे, त्यामुळे त्यांनी प्राणवायू कॉन्स्ट्रेटर बँक करण्याचा निश्चय केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेनुसार विदर्भातील तालुका, नगर परिषद क्षेत्रात तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय प्राणवायू कॉन्स्ट्रेटर बँक सुरू करता येईल. प्रत्येक बँकेत पाच कॉन्स्ट्रेटर देण्यात येतील एवढंच नाही तर त्या करिता आवश्यक तर प्रशिक्षणही दिलं जाणार आहे. कोविड काळात मोठ्या प्रमाणात दानदात्यांनी ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, ऑक्सिजन सिलेंडर, बायपॅक मशीनसह अनेक साधन उपलब्ध करून दिली आहेत, या संसाधनांचा उपयोग विदर्भातील आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी केला जाणार आहे
बँक सुरू करण्यासाठी अर्ज मागवले जाणार -
ऑक्सिजन कॉन्संट्रेटर बँक सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांच्या योजनेनुसार तालुका, नगरपरिषद आणि महानगरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक कॉन्संट्रेटर बँक असेल सोबत जिल्हा स्तरावर म्हणजे शहरात दोन बँक देण्यात येतील. बँक सुरू करण्यासाठी धर्मदाय आयुक्तालय अंतर्गत काम करणाऱ्या संस्था, शैक्षणिक संस्था,धार्मिक संस्था,मंदिर ट्रस्ट,सेवाभावी कार्य करणार्यांना कॉन्संट्रेटर बँक सुरू करण्यासाठी मदत केली जाणार आहे