नागपूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठाने दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. एकाच दिवशी एमपीएससी आणि विद्यापीठाची परीक्षा आहे. त्यामुळे एकाच दिवशी आणि एकाच वेळी दोन परीक्षा कशी द्यायची या संभ्रमात अडकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा अन्य दिवशी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी परिपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.
प्रवेशपत्र महाविद्यालयात करावे लागणार सादर -
४ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा नियोजित आहे. भविष्यात शासकीय नोकरी जाण्याचे स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थी गेल्या अनेक महिन्यांपासून एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करत आहेत. मात्र त्याच दिवशी नागपूर विद्यापीठाच्या काही विभागांची परीक्षा असल्याने या विद्यार्थ्यांना एमपीएससीच्या परीक्षेला मुकावे लागेल अशी शक्यता निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांची अडचण लक्षात येताच नागपूर विद्यापीठाने एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा पेपर अन्य दुसऱ्या दिवशी घेण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र त्या करीता परीक्षार्थीं विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जारी केलेले हॉल तिकीट (प्रवेश पत्र) महाविद्यालयात सादर करावे लागणार आहे.
विद्यापीठाने जारी केले प्रसिद्धीपत्रक -
या विषयाच्या अनुषंगाने नागपूर विद्यापीठाने एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. ज्यामध्ये सर्व संबधीत महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राचार्य आणि विभाग प्रमुखांना सुचित केले आहे की, २०२१ च्या उन्हाळी परीक्षेदरम्यान ४ सप्टेंबर रोजी होत असलेल्या एमपीएससी परीक्षेमध्ये जे विद्यार्थी विद्यापीठाच्या परीक्षेसोबत त्यावेळे दरम्यान परीक्षा देत आहे, अशा विद्यार्थ्यांनी त्यांची माहीती एमपीएससी परीक्षेच्या प्रवेश पत्रासह आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या मार्फत परीक्षा विभागाला कळवावी लागणार आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रात राजकीय काला : दहीहंडी, आगामी सणांवरुन राज्य सरकार-विरोधक संघर्ष पेटणार?