नागपूर - नागपूर वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालयात एका 27 वर्षीय कोरोना रुग्णावर उपचार सुरू होते. मात्र शनिवारी सकाळच्या सुमारास हा रुग्ण अचानक रुग्णालयातून बेपत्ता झाल्याने, चांगलीच खळबळ उडाली. रुग्ण बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच, त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. अखेर हा रुग्ण तब्बल 9 तासांनी नागपुरातील चिंचभवन परिसरातील एका खोलीत आढळून आला.
रुग्ण मानसिकदृष्ट्या अस्थिर
11 मार्चला हिंगणघाट तालुक्यातील कोपरा येथील 27 वर्षीय रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने, त्याला नागपूरात भरती करण्यात आले होते. मात्र तो रुग्णालयातून अचानक गायब झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान या संबंधित तरुणाचा फेब्रुवारी महिन्यात अपघात झाला होता, तेव्हापासून त्याची मानसिक स्थिती चांगली नसल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. 9 मार्चला खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेला असता, त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तेव्हापासून तो रुग्णालयात दाखल होता.
तब्बल 9 तासांनी मिळाला रुग्ण
मात्र शनिवारी सकाळच्या सुमारास हा तरुण अचानक रुग्णालयातून बेपत्ता झाला. तरुण बेपत्ता झाल्याने रुग्णालयात एकच खळबळ उडाली. यावेळी त्याचा भाऊ त्याला चिंचभवन येथे शोधण्यासाठी गेला असता, तो घरात बिस्कीट खाताना आढळून आला. दरम्यान त्याच्या कोणी संपर्कात आले आहे का? याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.